भ्रष्ट अधिकाऱ्यांनो सांभाळून राहा - सीमा सावळे

मिलिंद वैद्य
शुक्रवार, 31 मार्च 2017

अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देते. ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांनो, सांभाळून राहा!’ असे ठणकावून सांगताना या शहराला एक मॉडेल शहर बनविण्याचा संकल्प स्थायी समितीच्या नियोजित अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली ही बातचीत...
 

अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देते. ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांनो, सांभाळून राहा!’ असे ठणकावून सांगताना या शहराला एक मॉडेल शहर बनविण्याचा संकल्प स्थायी समितीच्या नियोजित अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली ही बातचीत...
 

प्रश्‍न : महापालिकेत भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर तुमच्या रूपाने अनुसूचित घटकातील एक महिला पहिल्यांदाच विराजमान होत आहे, काय वाटते?
सीमा सावळे -
 हे पद मिळेल असे कधी वाटले नाही. पण पक्षाने अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि सारंग कामतेकर यांनी माझ्यावर विश्‍वास दाखविला, त्याबद्दल मी ऋणी आहे. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने जो भ्रष्ट कारभार केला, त्या विरुद्ध लढा देताना सर्व पत्रकार, माध्यमांनी साथ दिली. सत्तांतर होण्यास मोठी मदत झाली, ते मी विसरू शकणार नाही. या यशाचे श्रेय माझे आई-वडील, कुटुंब, मुलगा सूरज, समर आणि माझे गुरू सारंग कामतेकर यांना देते. 

प्रश्‍न : कामाचा प्राधान्यक्रम कसा असेल?
सीमा सावळे -
 पाणी, वीज, रस्ते यांसारख्या सुविधा मिळवून देणार आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. शहराला ‘मॉडेल’ शहर बनविण्याचा संकल्प केला आहे. 

प्रश्‍न : स्वच्छतेच्या बाबतीत विशेषत: महिलांच्या बाबतीत शहरात सुविधा अपुऱ्या आहेत.
सीमा सावळे -
 महिलांच्या प्रश्‍नांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष घालणार आहोत. पुण्याप्रमाणे She Toilet सुविधा सुरू करणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जातील. पवना धरणाची क्षमता संपल्याने आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पाणी मिळविले जाईल.

प्रश्‍न : शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होण्यासाठी कोणत्या योजना राबविणार?
सीमा सावळे -
 लास वेगास शहराप्रमाणे या शहराचा विकास करायचा आहे. केंद्र, राज्यात भाजपचेच सरकार असल्याने योजना राबविताना अडचणी येणार नाहीत. पवना सुधार योजना राबवू. नदीच्याकडेने रावेत-दोपोडीपर्यंत रस्ता करण्याचा विचार आहे. निधी मिळाला म्हणून आधीच्या सत्ताधाऱ्यांनी निगडी ते दापोडी बीआरटी कॉरिडॉर बनविला. पण त्याचा काही उपयोग नाही. अभ्यास करून बीआरटी मार्ग काढून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला जाईल. शहरातील उद्याने सुशोभीत केली जातील. लोकलच्या फेऱ्या व तिसरा लोहमार्ग विकसित करून लोणावळा-पुणे लोकल वाहतूक वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन मार्गी लावला जाईल. सरकारच्या मदतीने आरक्षित जागा ताब्यात घेऊन परवडणारी घरे बांधली जातील.

प्रश्‍न - मूर्ती घोटाळा, गॅस शवदाहिनी घोटाळा यांचे काय करणार?
सीमा सावळे - आमची सत्ता आली म्हणून सुडाचे राजकारण करणार नाही; पण जे घोटाळे झाले व ज्या प्रकरणाविषयी संशय आहे, त्या कामाच्या फायली पुन्हा उघडून वरिष्ठांपर्यंत पोचविल्या जातील. घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल. त्यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल. पदाधिकाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.

Web Title: corrupted officer alert