बारामतीत 250 अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

बारामती शहर  - नागरिक आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा श्‍वास घेतला. 

बारामती शहर  - नागरिक आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा श्‍वास घेतला. 

बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाबद्दल नागरिकांकडून होत असलेली टीका व माध्यमांतून वारंवार याबाबत उठविलेल्या आवाजाची दखल घेत आज बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने इंदापूर चौक ते गुनवडी चौक आणि गुनवडी चौक ते शिवाजी चौकातील तब्बल २५० छोटी- मोठी अतिक्रमणे काढून टाकली. यातही फळ व भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना नवीन मंडईत हलविण्यात आले असून, या पुढील काळात या रस्त्यावर फळे व भाजीपाला विक्रीस मनाई करण्याचाही निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. अतिक्रमण विभागाने आज सकाळपासूनच रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. हे करताना कोणत्याही व्यावसायिकाचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली गेली. त्यामुळे या कारवाईला फारसा विरोध झाला नाही. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनील धुमाळ, राजेंद्र सोनवणे आणि नगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. 

या रस्त्यावर अनेक वर्षांपासून सातत्याने अतिक्रमण होत होते. मात्र, त्याकडे जुजबी कारवाई करून दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतली जात होती. आता मात्र समाजाच्या सर्वच घटकांतून दबाव वाढल्यानंतर मात्र नगरपालिकेने आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला गती दिली. इंदापूर चौक व गुनवडी चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होणे व पादचाऱ्यांना व्यवस्थित चालताही न येणे, अशा बाबी घडत. त्याबाबत नगरपालिकेवर सातत्याने टीका होत होती.

गुन्हे दाखल करणार 
ठराविक लोकांच्या अतिक्रमणामुळे होणारी कोंडी दूर करण्यासाठी आता कडक कारवाईचे पाऊल उचलण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या पुढील काळात अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात थेट गुन्हे दाखल करण्याचाच निर्णय घेण्यात आला असून, कायदेशीर कारवाईही प्रशासन करणार आहे.

Web Title: crime on 250 encroachment