पीकविम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

पुणे - गेल्या वर्षी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या ७१ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली होती. जाहीर केलेली ही नुकसानभरपाई बॅंकामार्फत देण्यात येत आहे. गेली तीन महिने उलटले तरीही पाच लाख सात हजार ६५६ शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. ती मिळविण्यासाठी अनेक शेतकरी बॅंकेकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. 

पुणे - गेल्या वर्षी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या ७१ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली होती. जाहीर केलेली ही नुकसानभरपाई बॅंकामार्फत देण्यात येत आहे. गेली तीन महिने उलटले तरीही पाच लाख सात हजार ६५६ शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. ती मिळविण्यासाठी अनेक शेतकरी बॅंकेकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी खरीप हंगामातील पिकांना पीकविम्याचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना राबविण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातील ८२ लाख ४२ हजार शेतकरी सहभागी झाले होते. त्यापैकी शासनाने ७१ लाख ५० हजार शेतकऱ्यांना चार हजार २०५ कोटीची नुकसानभरपाई जाहीर केली होती. प्रत्यक्षात शासनाने ६५ लाख ७८ हजार ५९३ शेतकऱ्यांची चार हजार २७९ कोटी १ लाख ३ हजार रुपये एवढी रक्कम बॅंकेकडे जमा करून नुकसानभरपाईची सर्व रक्कम बॅंकामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश शासनाने दिले होते; परंतु बॅंकेने ६० लाख ७० हजार ९३७ शेतकऱ्यांना चार हजार १०० कोटी ६१ लाख ४७ हजार रुपये अदा केले. सध्या बॅंकेकडे सुमारे पाच लाख सात हजार ६५६ शेतकऱ्यांचे १७८ कोटी ३९ लाख ५६ हजार रुपये पडून अाहेत.

सध्या बॅंकेने ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या विभागांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची सर्व रक्कम अदा केली आहे; परंतु अमरावती आणि लातूर विभागांतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याचे बाकी आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘एकूण मिळालेल्या नुकसानभरपाईच्या ५० टक्के नुकसानभरपाईची रक्कम लातूर विभागातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्यापैकी सर्वाधिक रक्कम ही बीड जिल्ह्याला मिळालेली आहे; परंतु लातूर आणि अमरावती विभागांतील शेतकऱ्यांनी असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राच्या पीकविम्याची रक्कम अनेक बॅंकामध्ये भरलेली आहे. काही शेतकऱ्यांनी दोन-दोन बॅंकांमध्ये पीकविम्याची रक्कम भरलेली आहे. पीकविम्याची नुकसानभरपाई देण्यासाठी बॅंकेकडून उलटतपासणी केली जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम दिली जात असल्याचे कारणे सांगून नुकसानभरपाई देण्यासाठी उशीर होत असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Crop insurance proceeds for farmers