विठ्ठलवाडीत भाविकांची गर्दी

 The crowd of devotees in Vitthalwadi
The crowd of devotees in Vitthalwadi

कळस - इंदापूर तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथे आषाढी एकादशीनिमित्त आज हजारो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. पहाटे येथील किशोर हरिश्चंद्र माने यांनी पत्नी सोनाली यांच्यासोबत देवाची महापूजा केली. त्यानंतर देवाचा अभिषेक झाला. 

दरम्यान, सकाळपासून भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी करण्यास सुरवात केली. तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकरामंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा  परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांबरोबर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देवदर्शनासाठी हजेरी लावली होती. देवस्थानच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन यावेळी आमदार भरणे व सभापती माने यांनी दिले. तर देवस्थान विकासाचा आराखडा तयार करुन नियोजन करण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेवून कार्यवाही करण्याचे आश्वासन माजी सहकारमंत्री पाटील यांनी दिल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष हरिश्चंद्र माने यांनी सांगितले.

सकाळी पळसदेव व कळस येथून देवाच्या पालख्यांनी येथील मंदिराकडे प्रस्थान ठेवले. याचबरोबर रुई, न्हावी या भागातील दिंड्याही येथे दाखल झाल्या होत्या. हरिनामाचा गजर करत या पालख्या दुपारी मंदिरात पोचल्या. यानंतर हभप श्रीहरी यादव (रामायणाचार्य) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. भाविकांसाठी दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत होते. मंदिर परिसरात फळे, फराळ व स्टेशनरी साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने येथे यात्रेचे स्वरुप आले होते. मंदिर परिसरापासून दूरवर वाहनांची पार्किंग करण्यात आल्याने, यंदा भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही. भाविकांसाठी पाणी, रस्ता आदींची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी येथे देवदर्शनाचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com