लैंगिक अत्याचारातील आरोपीला कोठडी

लैंगिक अत्याचारातील आरोपीला कोठडी

पिंपरी - दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यापैकी एकीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीला गुरुवारी (ता. २०) न्यायालयासमोर हजर केले. त्यास (ता. २५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

गणेश निकम (वय २२, रा. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कर्मचारी वसाहत, कासारसाई) असे हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला शिवाजीनगर न्यायालयासमोर हजर केले असता, पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी आणखी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.

कासारसाईत भीतीचे वातावरण कासारसाई येथील संत तुकाराम मंदिर परिसरातील झुडपात नेऊन आरोपींनी दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित दोन्ही मुली वर्गमैत्रिणी आहेत. निकम हा सांगवीतील एका महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकतो.  अल्पवयीन आरोपी अकरावीत शिकत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनोळखी व्यक्‍तीसोबत बोलण्यास तयार नाहीत. हा परिसर गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून, येथे वर्दळ नसते. त्याचा फायदा आरोपींनी घेतला. यापैकी मृत मुलीवर दोघांनीही लैंगिक अत्याचार केला.

झोपड्या सोडण्यास सांगितले
संत तुकाराम सहकारी साखर कारखाना परिसरात अनेक ऊसतोड मजूर झोपड्या बांधून राहतात. ठेकेदाराशी करार झालेल्या मजुरांनीच येथे थांबावे व इतरांनी येथून निघून जावे, अशी सूचना झोपडीधारकांना दिल्याने त्यांच्यासमोर निवासाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आरोपींना ३०२ ऐवजी ३७६ (अ) कलम
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची (१४ वर्षे) शिक्षा असते. मात्र, ३७६ (अ) कलमात सरकारने बदल केले आहेत. या गुन्ह्यामध्ये लैंगिक अत्याचार करताना पीडिताचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास २० वर्षे शिक्षेची तरतूद केली आहे. यामुळे ३०२ ऐवजी ३७६ (अ) कलम लावण्याचा विचार पोलिस करीत असून, त्यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. तसेच लैंगिक गुन्ह्यातील आरोपी जरी १६ वर्षांचा असला, तरी तो सज्ञान म्हणून त्याच्यावर कारवाईला परवानगी द्यावी, अशी मागणी बाल न्यायालयात करण्यात येणार असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com