अज्वा, अंबर, कलमी खजुराची आवक घटली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

हवामान बदल अन नोटाबंदीचा व्यवसायाला फटका
पुणे - रमजान महिन्यात विदेशातून येणाऱ्या खजुराची उलाढाल करोडो रुपयांमध्ये होते. यंदा मात्र हवामानातील बदल आणि नोटाबंदीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे अज्वा, अंबर, कलमी, सुरकी, किम्या यांसारख्या अनेकविध प्रकारच्या खजूराची आवक घटली आहे. परिणामी, दरवर्षीच्या तुलनेत व्यापाऱ्यांनीही घाऊक बाजारातून मर्यादित स्वरूपात खजूर उचलला आहे.

सौदी अरेबिया, इराण, दुबई, जॉर्डन, बेल्जियम, ट्युनिशिआ येथून खजूर येतो. मुंबईत वाशी येथील घाऊक बाजारपेठेतून व्यापारी खजूराची खरेदी करतात. रमजानचा महिना चार-पाच दिवसांवर आला आहे. कॅम्प भागातील शिवाजी मार्केट, गणेश पेठेतील चाँदतारा मशीद, कोंढव्यातील कौसरबाग येथे खजूर विक्रेत्यांचे स्टॉल्स असतात. मात्र यंदा अजूनही व्यापाऱ्यांची तयारी फारशी झालेली दिसत नाही.

देशात राजस्थान येथून पिवळा व लालसर रंगाचा खजूर येतो. परंतु, त्यापेक्षा विदेशातील खजुराला विशेष पसंती असते. त्यातही महम्मद पैगंबर यांनी ‘अज्वा’ या खजुराचे झाड लावले होते. त्यामुळे त्या खजुराला प्राधान्य असते. इफ्तारच्या वेळेस खजूर खाऊन पाणी पिऊन रोजा सोडण्याची पद्धत आहे. त्यामुळे रमजानमध्ये खजुराची खरेदी-विक्रीतून करोडोंची उलाढाल होते. परंतु, यंदा आवक पाहून व्यापाऱ्यांनी मर्यादित माल खरेदी केला आहे. याबाबत विक्रेते जावेद शेख म्हणाले, ‘‘खजुराच्या उत्पादनासाठी उष्ण हवामान लागते. मात्र पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.’’

खजुरामुळे रक्तवाढीस मदत होते. मात्र यावेळेस कमी प्रमाणात आवक झाली आहे. दरवर्षी घाऊक बाजारपेठेत आमच्या चार-पाच खेपा होतात. यंदा पहिल्या खेपेत फक्त दोन लाखांपर्यंतचाच माल खरेदी केला. साठ रुपये किलोपासून चार हजार रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे खजूर विक्रीस आहेत.
- अब्दूल रज्जाक , विक्रेते