शहरभर धूलिवंदनाचा जल्लोष 

शहरभर धूलिवंदनाचा जल्लोष 

पुणे - अचानक अंगावर फेकले जाणारे रंगीबेरंगी पाण्याने भरलेले फुगे, पिचकाऱ्यांमधील रंगांचे फवारे आणि मुठीतील कोरडा रंग मित्रांना लावण्यासाठी धडपडणारी बच्चे कंपनी धमाल करताना दिसत होती. तर, दुसरीकडे आपापल्या ग्रुपबरोबर रंगात न्हाऊन निघालेले आणि शहरभर "बाइक राइड' करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी जल्लोष करीत होते. बहुतांश भागातील महिला-युवतींसह ज्येष्ठ नागरिकही रंगांच्या दुनियेत हरवून गेल्याचे चित्र सोमवारी शहरात दिसत होते. धूलिवंदनाच्या सणामुळे रस्त्यांनीही सप्तरंगी चादर पांघरल्याचे दृश्‍य पुणेकरांनी अनुभवले. 

पुणेकरांची सोमवारची सकाळ सप्तरंगांच्या उधळणीने उगवली. मध्यवर्ती भागातील पेठा, वाडे, उपनगरांमधील वस्त्या, मोठ-मोठ्या सोसायट्या, विद्यापीठ, महाविद्यालयांचा परिसर, वसतिगृहांसह प्रमुख रस्त्यांवर सकाळपासूनच रंगोत्सव साजरा करण्यास सुरवात झाली होती. हातात पिचकारी, फुगे व रंग घेऊन बच्चे कंपनी आपापल्या मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन रंग लावण्यात दंग होती. रंग लावून घेण्यास घाबरणाऱ्या प्रत्येकाला शोधून काढत त्यांना अक्षरशः रंगात भिजवून काढण्याची स्पर्धाच जणू मुलांमध्ये लागल्याचे चित्र सगळीकडे दिसत होते, तर काही ठिकाणी महिला, युवती व आजी-आजोबांनीही मुलांबरोबर रंग खेळण्याचा आनंद लुटला. काही सोसायट्यांनी मुलांसाठी रंग, फुगे, पिचकारी व अंघोळीसाठी पाण्याचीही व्यवस्था केली होती. 

विद्यापीठ, महाविद्यालयांसह त्यांच्या वसतिगृहांभोवती युवक-युवती जमून रंगांचा आनंद घेत होते. काही जण आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच चित्रपट पाहून आनंद साजरा करण्यास प्राधान्य देत होते. रंग खेळल्यानंतर "लॉंग ड्राइव्ह'वर निघालेल्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणच्या चौकांत वाहतूक पोलिस भेटत होते. विद्यार्थ्यांकडूनही "काका, आजच्याच दिवस प्लीज सोडा ना!' असे म्हणताच पोलिस काकाही "पुन्हा असे करू नका' अशी "समजूत' काढत त्यांना सोडून देत होते. काही खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनीही धूलिवंदनाचा आनंद लुटला. 

धरणाभोवती मानवी साखळी 
रंग खेळणाऱ्यांनी धरण व तलावांमध्ये अंघोळीसाठी जाऊ नये, यासाठी हिंदू जनजागृती समिती व कमिन्स इंडिया यांच्यातर्फे खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी केली होती. सुमारे शंभर जणांनी या उपक्रमात सहभागी होऊन तरुणांना पाण्यात उतरण्यास मज्जाव केला. या वेळी प्रवचनकार विद्यानंद महाराज, दामोदर रामदासी, प्रवीण नाईक, कृष्णाजी पाटील, पराग गोखले आदी उपस्थित होते. या संघटनांना पोलिसांचेही सहकार्य मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com