नको उल्लंघन वाहतुकीच्या नियमांचे!

अनिल सावळे
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

"असंख्य पुणेकर वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात'... ही आपल्यासाठी बातमी नाही; पण त्या नियम तोडण्यातही सिग्नल तोडण्याचा गुन्हा करण्यात पुणेकर "आघाडी'वर आहेत, ही मात्र बातमी ठरते. चालू वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत सिग्नल तोडल्याबद्दल दोन लाख 96 हजार खटले दाखल करण्यात आले, तर तब्बल तीन कोटी 56 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुणेकरांच्या मानवी साखळीनंतर गेल्या काही दिवसांत ही स्थिती खूपच बदलली असून, वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रमाण घटण्यास सुरवात झाली आहे. 
 

"असंख्य पुणेकर वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात'... ही आपल्यासाठी बातमी नाही; पण त्या नियम तोडण्यातही सिग्नल तोडण्याचा गुन्हा करण्यात पुणेकर "आघाडी'वर आहेत, ही मात्र बातमी ठरते. चालू वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत सिग्नल तोडल्याबद्दल दोन लाख 96 हजार खटले दाखल करण्यात आले, तर तब्बल तीन कोटी 56 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुणेकरांच्या मानवी साखळीनंतर गेल्या काही दिवसांत ही स्थिती खूपच बदलली असून, वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रमाण घटण्यास सुरवात झाली आहे. 
 
शहरात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम नाही. येथील अरुंद रस्ते आणि त्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतूक कोंडी हे शहरवासीयांचे दररोजचे दुखणे झाले आहे. या समस्येमुळे वाहनचालकांना रस्त्यावर बराच वेळ खर्ची घालावा लागतो. शिवाय, पैसा आणि इंधनाची नासाडी होत आहे. त्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे आणखी या समस्येत वाढ होत आहे. 

पुण्याच्या बेशिस्त वाहतुकीचा आढावा ः 

1. झेब्रा क्रॉसिंग :  रस्त्यांवर पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आले आहेत. पादचारी म्हणजे स्वत:, नातेवाईक, मित्रांसह पायी जाणाऱ्या सर्व नागरिकांना सन्मानाने वागविणे आपले कर्तव्य आहे. 
या नियमाचं उल्लंघन केल्यास पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचण निर्माण होते. गंभीर अपघात होण्याची शक्‍यता. 
दंडाची तरतूद : मोटार व्हेईकल ऍक्‍ट 237/177 नुसार दोनशे रुपये दंड 
वर्ष 2016 मधील ऑक्‍टोबर अखेरपर्यंत कारवाई : 
एकूण खटले - 16 हजार 179 
दंडआकारणी - तीन कोटी 56 लाख 71 हजार आठशे रुपये 

2. नो हॉर्न :  सतत हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी योग्य वेळीच हॉर्नचा वापर करावा. रुग्ण, विद्यार्थी आणि समोरच्या वाहनचालकास त्रास होऊ नये, यासाठी हॉर्न वाजवू नये. 
उल्लंघन केल्यामुळे होणारे नुकसान : 
सतत हॉर्न वाजविल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण 
रुग्णालयांसमोर हॉर्न वाजविल्यामुळे रुग्णांना त्रास होतो 
शाळा-महाविद्यालयासमोर हॉर्न वाजविल्यास विद्यार्थ्यांना त्रास होतो 
कर्णकर्कश हॉर्नमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास होतो 
सतत हॉर्न वाजविल्यामुळे अन्य वाहनचालकांचे लक्ष विचलित झाल्यास अपघाताचा धोका संभवतो 
मानसिक संताप, श्रवणक्षमता प्रभावित होते 
दंडाची तरतूद : 
केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार तरतूद 
सीएमव्हीआर 119 (2) /190 नुसार एक हजार रुपये दंड 
सीएमव्हीआर 119 (2) /190 (2) नुसार पाचशे रुपये दंड 
119 (2)/177 नुसार दोनशे रुपये दंड 
96 (1)/177 नुसार दोनशे रुपये दंड 
चालू वर्षातील ऑक्‍टोबरअखेर कारवाई - एकूण खटले 2191 
दंडआकारणी- चार लाख 95 हजार 600 रुपये 

3. हेल्मेटचा वापर :  दुचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे 
पुणे शहरात आजअखेर दुचाकींची संख्या 23 लाख 89 हजार 299 आहे 
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास प्रवास सुखकर होऊ शकतो 
अपघात झाल्यास डोक्‍याला गंभीर प्रकारची इजा टाळणे शक्‍य होते 

नियमांचे उल्लंघन केल्यास होणारे नुकसान ः 
विनाहेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास अपघाती मृत्यू होऊ शकतो 
सन 2015 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे डोक्‍याला मार लागून 240 दुचाकीस्वारांचा मृत्यू 
चालू वर्षात ऑक्‍टोबरअखेर 132 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू 
दंडाची तरतूद - एमव्ही ऍक्‍ट 129 /177 नुसार पाचशे रुपये दंड 

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई ः 
एकूण खटले : 54 हजार 754 
चालू वर्षातील दंडआकारणी- 71 लाख 34 हजार दोनशे रुपये 

4. सिग्नलचे उल्लंघन (सिग्नल जंपिंग) :  शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी, यासाठी वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत 
सिग्नलचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होते 
वाहतूक कोंडी होत नाही. सिग्नलचे उल्लंघन केल्यामुळे गंभीर अपघाताची शक्‍यता असते 
दंडाची तरतूद ः 
एमव्ही ऍक्‍ट 119/177, 
रुल्स ऑफ द रोड रेग्युलेशन्स 22 (1) /177, आरआरआर 8/177 नुसार दोनशे रुपये दंड 
चालू वर्षातील ऑक्‍टोबरअखेर कारवाई ः 
एकूण खटले - दोन लाख 96 हजार 797 
दंडआकारणी - तीन कोटी 56 लाख 71 हजार आठशे रुपये 

5. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे (रॉंग साइड ड्रायव्हिंग) :  विरुद्ध दिशेने वाहन न चालविल्यास रहदारीस अडथळा येणार नाही. गंभीर स्वरुपाचा अपघात होणार नाही 
पादचारी झेब्रा क्रॉसिंगवरून सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल 
उल्लंघन केल्यास होणारे नुकसान - गंभीर अपघात होऊ शकतो तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होतो 
दंडाची तरतूद- आरआरआर 2/177 नुसार दोनशे रुपये दंड 
चालू वर्षातील कारवाई - 
एकूण खटले 68 हजार 460 
दंडआकारणी- 81 लाख 89 हजार आठशे रुपये 

6. रुग्णवाहिकेला रस्ता द्या (गिव्ह वे ऍम्ब्युलन्स) :  रुग्णवाहिकेला जीवनवाहिनी म्हणून संबोधले जाते. रुग्णवाहिकेमधील रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देणे अपेक्षित आहे. जेणेकरून त्या रुग्णांचे प्राण वाचतील. रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा मिळावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी "गिव्ह वे ऍम्ब्युलन्स' या नावाने उपक्रम सुरू केला आहे. 
वाहतूक नियंत्रण कक्षात मोबाईल क्रमांक- 8411800100 
सर्व रुग्णालये आणि रुग्णवाहिकेच्या चालकांसोबत संपर्क. 
संबंधित चालक रुग्णवाहिका निघताना वाहतूक नियंत्रण कक्षात कळवितात. त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून त्या रुग्णवाहिकेला रस्ता खुला करून दिला जातो. 

अभियानामुळे नियमांबाबत जागृती  

केवळ समस्या मांडूनही प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यामुळे उपाययोजनांच्या दृष्टीने सकारात्मक विचार करायला हवा. केवळ प्रशासनच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने त्या प्रश्‍नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचं ठरवलं तर वाहतूक कोंडीवर मार्ग निघू शकेल. म्हणूनच पुणे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी मानवी साखळी तयार केली. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सह आयुक्‍त सुनील रामानंद आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांनी शहरात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबविले. त्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. "सकाळ' माध्यम समूहानेही या जनजागृती अभियानात पुढाकार घेतला. या अभियानानंतर नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जण नियम पाळत आहेत. झेब्रा क्रासिंगवर रस्त्यावर "स्टॉप लाइन'वर वाहने थांबत असल्याचे चित्र दिसते आहे.

Web Title: Do not violate the traffic rules