'ससून'मध्ये दोन किलोची थायरॉईड गाठ काढली

यशपाल सोनकांबळे
रविवार, 1 एप्रिल 2018

एका 48 वर्षीय महिलेला आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड अर्थात 'थायरॉईड गॉयटर'ची गाठ झाली. गेल्या वीस वर्षांपासून त्याच्यावर चटके देणे, गोंदविणे अशा अघोरी उपचारानंतर अखेर ससून रुग्णालयात त्या दाखल झाल्या. त्यानंतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर तब्बल दोन किलोंची गाठ काढण्यात ससूनच्या डॉक्‍टरांना यश मिळाले. 

एका 48 वर्षीय महिलेला आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड अर्थात 'थायरॉईड गॉयटर'ची गाठ झाली. गेल्या वीस वर्षांपासून त्याच्यावर चटके देणे, गोंदविणे अशा अघोरी उपचारानंतर अखेर ससून रुग्णालयात त्या दाखल झाल्या. त्यानंतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर तब्बल दोन किलोंची गाठ काढण्यात ससूनच्या डॉक्‍टरांना यश मिळाले. 

या संदर्भात नाक, कान, घसा शल्यचिकित्सक डॉ. संजयकुमार सोनावले म्हणाले, ''गेल्या वीस वर्षांपासून गळ्याभोवती गाठ होती. गाठीचा आकार 15 बाय 10 सेंमी इतका, तर त्याचे वजन सुमारे दोन किलो इतके असल्यामुळे श्‍वासनलिकेवर दाब येऊन श्‍वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता. ही गाठ गळ्यात आणि खाली बरगड्यांमध्ये फसल्यामुळे यावरील शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची बनली. यासाठी शक्‍यतो छातीच्या बरगड्या कापून शस्त्रक्रिया करावी लागते, परंतु गळ्याभोवती छेद देऊन बोटांच्या साह्याने संपूर्ण गाठ अलगद काढली. शस्त्रक्रियेनंतर गळ्याभोवती शस्त्रक्रियेची खूण दिसू नये यासाठी 'कॉस्मेटिक सर्जरी'देखील केली आहे. ही गाठ कर्करोगाची होती, त्याकडे आणखी दुर्लक्ष केले असते, तर कर्करोग बळावला असता.'' 

ज्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, त्या दौंड तालुक्‍यातील रहिवासी सुनीता शिंदे म्हणाल्या, ''गेल्या वीस वर्षांपासून गाठीकडे दुर्लक्ष केले, चटके देणे, गोंदविणे असे अघोरी उपचार केले. अखेर ससूनच्या डॉक्‍टरांनी मला जीवदान दिले.'' 

या शस्त्रक्रियेत ससून रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि विभागप्रमुख डॉ. समीर जोशी यांनी शस्त्रक्रियेसाठी साधने उपलब्ध केली. सुमारे दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सोनावले यांच्यासमवेत निवासी डॉ. रूपाली बोरकर, डॉ. गुनीत कौर, डॉ. विजय राऊत आणि भूलतज्ज्ञ डॉ. माया जामकर यांनी सहकार्य केले. 

'थायरॉईड गॉयटर' म्हणजे काय? 
थायरॉईड ग्रंथी या मानेसमोर फुलपाखराच्या आकारात असतात. या ग्रंथींद्वारे शरीराची ऊर्जा आणि वजन संतुलित ठेवण्याचे काम केले जाते. शरीरातील आयोडीनच्या कमतरतेमुळे 'थायरॉईड' ग्रंथींची गाठीच्या स्वरूपात गळ्याभोवती वाढ होते. त्यामुळे श्‍वासनलिका आणि स्वरयंत्रावर दाब पडून श्‍वसन आणि बोलण्यास त्रास होतो. गाठीकडे दुर्लक्ष केल्यास कर्करोग होतो. तातडीने वैद्यकीय उपचार आणि 'टोटल थायरॉइडेक्‍टॉमी' शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून टाकता येते. 

निदान करण्याचे प्रकार 

  • मानेची सोनोग्राफी 
  • एक्‍स रे 
  • थायरॉईड फंक्‍शन टेस्ट 
  • सीटी स्कॅन 
  • रक्त तपासणी
Web Title: Doctors removed thyroid tumor weighing two kilos at Sasoon Hospital