चाचणी न करताच मीटर

Electric-Meter
Electric-Meter

लोणी काळभोर - वीज ग्राहकांना नवीन मीटर देण्यापूर्वी चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, लोणी कंद, वाघोली परिसरांतील जवळपास सर्वच ग्राहकांना चाचणी न घेताच महावितरणकडून मीटर दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून चाचणी न करताच ग्राहकांच्या माथी मीटर मारले जात असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  ग्राहकांना देण्यात येणारी वीज बिले व नवीन मीटर तपासून येतात की नाही याबाबतची माहिती उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रतिकांत बबन यादव यांनी मागवली होती.

यात वीजमीटर देणाऱ्या कंपनीतर्फे मीटर योग्य आहे की नाही याची चाचणी न करताच ग्राहकांना मीटर दिले जात असल्याची निष्पन्न झाले आहे.  
महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागातील ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून वाढीव वीजबिल येत आहे. यादव यांच्या घरचे बिलही जादा येत असल्याने त्यांनी उरुळी कांचन येथील महावितरणच्या कार्यालयात लेखी तक्रार दिली. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यादव यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना, महावितरणच्या मुळशी विभागातून देण्यात येणारे नवीन मीटर कसलीही चाचणी न करताच थेट ग्राहकांना देण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच हा प्रकार गेल्या दहा वर्षांपासून सुरू असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यादव यांनी या संभाषणाची व्हिडिओ क्‍लिप बनविल्याने महावितरणचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला.  

तपासणीसाठी अपुरे कर्मचारी
याबाबत महावितरणच्या फुरसुंगी येथील मीटर तपासणी लॅबमधील एक अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून एलएनटी, एचपीएल, एचई, पीएम, रोलॅक्‍स, फ्लॅश व जिनस या सात मीटर उत्पादक कंपन्यांचे मीटर ग्राहकांना दिले जात आहेत. त्यापैकी पीएम, रोलॅक्‍स, फ्लॅश या तीन कंपन्यांना सदोष मीटर असल्याने काळ्या यादीत टाकले आहे. सध्या उर्वरित कंपन्यांचे मीटर दिले जातात. कंपन्यांकडून हजारोंच्या संख्येने नवीन मीटर दिले जातात. फुरसुंगी येथे मीटर तपासणी लॅब असली तरी चाचणीसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने अपवाद वगळता एकाही नवीन मीटरची चाचणी न घेता उरुळी कांचन, हडपसर, मुळशी व नारायणपूर येथील उपविभागीय कार्यालयांना मीटर पाठवले जातात.

त्यासोबत मीटर सील करण्यासाठीचे साहित्यही दिले जाते. याबाबतची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना असल्याने, कर्मचारी आपापल्या भागातील ग्राहकांना मीटर देण्यापूर्वी सांकेतिक क्रमांक टाकून नवीन मीटर देतात. हा प्रकार गेली काही वर्षांपासून सुरू आहे.

फुरसुंगी कार्यालयाकडून पुरविण्यात आलेले मीटर चाचणी केले आहेत व वीज कंपनीच्या मापदंडानुसार असल्याचे गृहीत धरून ग्राहकांना दिले जातात. सर्वच मीटरची चाचणी केली जात नाही ही बाब सत्य आहे. कंपन्यांकडून देण्यात येणारे मीटर मापदंडानुसार असल्याने ग्राहकांच्या फारशा तक्रारी येत नाहीत. मात्र कोणाची तक्रार असल्यास, त्यांनी कार्यालयात नोंदवावी.
- प्रदीप सुरवसे, कार्यकारी अभियंता, उरुळी कांचन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com