‘रोहयो’तून १२ हजार मजुरांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोत आटत चालले असून, पाण्याअभावी शेतीची कामे कमी झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामांवर मजुरांची संख्या वाढली आहे. या योजनेंतर्गत विभागात २ हजार ६९ कामे सुरू आहेत. त्यातून १२ हजार ४३८ मजुरांना शंभर दिवसांचा रोजगार दिल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये पुणे जिल्ह्यातील ५०४ कामांवर २ हजार ७१६ मजूर, साताऱ्यामध्ये ४७७ कामांवर ३ हजार ८१०, सांगलीमध्ये १९६ कामांवर २ हजार ६०८, सोलापूरमध्ये १४७ कामांवर ८६४ आणि कोल्हापूरमध्ये ७४५ कामांवर २ हजार ४७४ मजूर हजर असल्याची आकडेवारी प्रशासनाने दिली.  

राज्य सरकारकडून ‘रोहयो’अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते तयार करणे, माती नालाबांध बनवणे, वनराई बंधारा, सामूहिक शेततळी, गावतलाव, साठवण तलाव, जैविक बंधारा, खारजमीन विकास बंधारा, पाझरतलावातील गाळ काढणे, रोपवाटिका, कालव्याची दुरुस्ती, नूतनीकरण व अस्तरीकरण, सिंचन विहीर आदी कामे केली जातात. विहीरखोदाईच्या कामांना सर्वांत जास्त मागणी आहे. पाणीटंचाईमुळे वृक्षलागवड आणि रोपवाटिकांची कामे कमी झाली आहेत. या योजनेमुळे आर्थिक दुर्बल घटकांतील सदस्यांना शंभर दिवसांचा रोजगार मिळतो; तसेच अकुशल कामगारांना आर्थिक दिलासा मिळत आहे.