बारामतीत अज्ञात इसमांनी सहा दुचाकी पेटवल्या

मिलिंद संगई
शनिवार, 29 जुलै 2017

आज पहाटे अडीचच्या सुमारास अभिनव अपार्टमेंटमधील टी-7 या इमारतीतील पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाडींनी पेट घेतल्याचे समोरच्या अपार्टमेंटमधील एका माणसाच्या लक्षात आले, त्याने तातडीने फोनवरुन ही बाब या अपार्टमेंटमधील एका व्यक्तीस सांगितल्यावर हा प्रकार पुढे आला.

बारामती- शहरातील हरिकृपानगरमधील अभिनव अपार्टमेंटमधील सहा दुचाकी आज पहाटे अज्ञात इसमांनी पेटवून दिल्याने परिसरात खळबळ माजली होती. दरम्यान या दुचाकीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाडीलाही पाचारण करण्यात आले होते. 

आज पहाटे अडीचच्या सुमारास अभिनव अपार्टमेंटमधील टी-7 या इमारतीतील पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाडींनी पेट घेतल्याचे समोरच्या अपार्टमेंटमधील एका माणसाच्या लक्षात आले, त्याने तातडीने फोनवरुन ही बाब या अपार्टमेंटमधील एका व्यक्तीस सांगितल्यावर हा प्रकार पुढे आला. या अपार्टमेंटमधील संजय भिसे, महेंद्र देशमुख, शेलार यांच्यासह इतरांच्याही सहा दुचाकी या अग्नितांडवात भस्मसात झाल्या. 

याच अपार्टमेंटमध्ये एक चार चाकी गाडीही होती मात्र ती तातडीने बाहेर नेल्याने तिचे नुकसान झाले नाही. या इमारतीतील लोकांनी अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केल्यावर त्यांनीही पाणी मारुन आग विझविली. या अग्नितांडवानंतर इमारतीत मोठा धूर पसरला होता, त्यानंतर या इमारतीतील लोक गच्चीवरुन दुस-या इमारतीवर चढून गेले व त्या इमारतीच्या जिन्याने खाली आले. लहान मुले या सर्व प्रकाराने कमालीची घाबरुन गेली होती. 

बारामतीत चिंतेचे वातावरण
या अग्नितांडवाच्या घटनेनंतर आज बारामतीत अनेक ठिकाणी या विचित्र घटनेनंतर चिंतेचे वातावरण पसरले आहे. समाजकंटकांकडून गाड्या पेटवून देण्याचे प्रकार बारामतीकरांनी इतक्या दिवस वाचले व ऐकले होते, मात्र आता हे लोण बारामतीपर्यंत येऊन पोहोचल्याने लोक चिंताग्रस्त आहेत. इतक्या दिवस या परिसरातील दुचाकीतून पेट्रोल चोरीला जाणे किंवा गाड्यांचे सुटे भाग चोरुन नेणे किंवा मुद्दाम दुचाकीचे नुकसान करणे असे प्रकार होत होते, आता गाडी पेटवून देण्याच्या प्रकाराने लोक हैराण आहेत. 

पोलिसांकडून तपासाच्या अपेक्षा
या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र पोलिसही अद्याप या घटनेबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसते. पंचनामा करुन तपास सुरु आहे या पलिकडे पोलिसही या बाबत काही सांगू शकले नाहीत.