‘एक्‍सप्रेस वे’वरील टोलच्या दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील टोलच्या दरात एक एप्रिलपासून तब्बल अठरा टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे महामार्गावरील प्रवास अत्यंत महागडा होणार असून, त्याचा फटका मालवाहतुकीलाही बसणार आहे. वास्तविक एक्‍स्प्रेस वेवरील टोलवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असतानाही वाढ लागू होणार असल्यामुळे नागरिकांकडून विरोध होण्याची शक्‍यता आहे.

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील टोलच्या दरात एक एप्रिलपासून तब्बल अठरा टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे महामार्गावरील प्रवास अत्यंत महागडा होणार असून, त्याचा फटका मालवाहतुकीलाही बसणार आहे. वास्तविक एक्‍स्प्रेस वेवरील टोलवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असतानाही वाढ लागू होणार असल्यामुळे नागरिकांकडून विरोध होण्याची शक्‍यता आहे.

पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवर २००२ पासून टोलवसुली सुरू झाली. दर तीन वर्षांनी या टोलच्या दरात संबंधित कंपन्यांकडून वाढ करण्यात येते. त्यानुसार यापूर्वी २०१४ मध्ये एक्‍स्प्रेस वेच्या टोलच्या दरात वाढ झाली होती. त्यास एप्रिल २०१७ मध्ये तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे एक एप्रिल २०१७ पासून दोन्ही महामार्गांवरील टोलच्या दरात अठरा टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून जाताना आतापर्यंत चारचाकी वाहनांना १०१ रुपये टोलपोटी मोजावे लागत होते, ते आता ११७ रुपये मोजावे लागणार आहेत.

तर, एक्‍स्प्रेसवरून मुंबईला जाताना चारचाकी वाहनांना १९५ रुपये टोलपोटी मोजावे लागत होते. ते आता २३० रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे- मुंबई या दोन्ही महामार्गांवरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यांना या टोलवाढीचा फटका बसणार आहे. एक्‍स्प्रेस वे टोल आकारणीतून सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल कंपनीला २ हजार ८६९ कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत टोलवसुलीतून या कंपनीला ३००७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एक एप्रिलपासून वाढ लागू झाल्यानंतर या मार्गावर दररोज ४८ कोटी रुपयांची टोलवसुली ५५ कोटी रुपयांवर जाणार आहे, तर जुन्या महामार्गावर सप्टेंबर २०१९ पर्यंत टोलवसुलीतून १ हजार ४६१ कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. गेल्या महिन्यापर्यंत १ हजार ३८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एक एप्रिलपासून नवीन वाढ लागू झाल्यानंतर येत्या चार महिन्यांत २०१९ पर्यंतचे उद्दिष्ट संबंधित टोल कंपनी पूर्ण करणार आहे.

विधानसभा निवडणुकीत टोलमुक्तीचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्याबाबत राज्य सरकार कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाही. दुसरीकडे मात्र टोलचे दर वाढणार असल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना सोसावा लागणार आहे.

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेवरील टोल दर पुढीलप्रमाणे (रुपयांमध्ये)
                                       जुना दर                 नवीन दर

चारचाकी वाहने                         १९५                   २३०
लाइट मोटर व्हेईकल (एलएमव्ही)      ३००                   ३५५
ट्रक                                    ४१८                   ४९३
बस                                    ५७२                   ६७५
एसटी बस                              ४६५                   ५५०
थ्री एक्‍सेल व्हेईकल                   ९९०                    ११६८
मल्टी एक्‍सेल व्हेईकल                १३१७                   १५५५ 

जुना पुणे- मुंबई महामार्ग 
                                       जुने दर     नवीन दर

चारचाकी                              १०१        ११७
लाइट मोटर व्हेईकल (एलएमव्ही)     १७९       २०७
ट्रक/बस/टू एक्‍सेल व्हेईकल           ३५५       ४११
मल्टी एक्‍सेल व्हेईकल                 ७६३       ८८४

Web Title: express way toll rate increase