कालव्यालगतचा रस्ता अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - सिंहगड रस्त्याला पर्यायी असलेला कालव्यालगतचा सुमारे साडेचार किलोमीटरचा रस्ता सहा महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होणार आहे; तर ह्यूम पाईप कंपनीपासून कर्वेनगरपर्यंतच्या विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता विकसित करण्यासाठी संबंधित जागामालक आणि परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सहमती दर्शविली आहे. 

सिंहगड रस्त्यावरील कालव्यालगत फनटाईम चित्रपटगृह ते हिंगणे, हिंगणे ते पु. ल. देशपांडे उद्यानादरम्यानच्या साडेचार किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातील फनटाईम ते हिंगणेदरम्यानच्या अडीच किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. आता हिंगणे ते पु. ल. देशपांडे उद्यानादरम्यानच्या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या रस्त्यासाठी नगरसेविका मंजूषा नागपुरे, श्रीकांत जगताप, आबा बागूल, तत्कालीन नगरसेवक विकास दांगट यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, ह्यूम पाईप कंपनी ते शिवसागर सिटी-कर्वेनगर आणि लगडमळा ते धायरीदरम्यान प्रयेजा सिटीकडे जाणारा प्रत्येकी 30 मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश विकास आराखड्यात आहे. हे दोन्ही रस्ते महापालिकेने तातडीने विकसित करावेत, यासाठी जागामालक हरिदास चरवड, काका चव्हाण, अशोक येनपुरे, हेमंत दांगट, रमेश दांगट, बाळासाहेब नवले आदींनी रविवारी सहमती दर्शविली. या प्रसंगी नगरसेविका नागपुरे उपस्थित होत्या. महापालिकेने विकास आराखड्यातील रस्त्यांची आखणी केल्यावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. याबाबत जागामालकांनी सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे आता महापालिकेच्या तत्परतेवर या दोन्ही रस्त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

Web Title: The final phase of the road