"ऋण कार्निव्हल'चा पहिला दिवस रंगला 

"ऋण कार्निव्हल'चा पहिला दिवस रंगला 

पुणे - युद्धभूमीवर धडाडणारी भारतीय सैन्यदलाची शस्त्रास्त्रे पाहून आश्‍चर्यचकित झालेली लहान मुले... सैन्यदलाच्या युद्धसामग्रीची माहिती घेणारे नागरिक... सैन्यदलाच्या शौर्याची कहाणी उलगडणारे जवान अन्‌ बॅण्ड पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण अशा वातावरणात शुक्रवारी "ऋण कार्निव्हल'चा पहिला दिवस रंगला. सैन्यदलाची शस्त्रास्त्रे पाहण्यासह पुणेकरांनी कानिर्व्हलमधील खाद्यभ्रमंती आणि खरेदीचा आनंद लुटला, तर लहान मुलांनी विविध मनोरंजक खेळांचा आनंद घेतला. 

जायबंदी झालेल्या जवानांचे पुनर्वसन करणाऱ्या "क्वीन मेरीज टेक्‍निकल इन्स्टिट्यूट'च्या शतकपूर्तीनिमित्त "ऋण- अब हमारी जिम्मेदारी' हा उपक्रम "रिडिफाइन कन्सेप्ट्‌स' यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे, त्याअंतर्गत जायबंदी झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हा कार्निव्हल आयोजिला आहे. कार्निव्हलचे उद्‌घाटन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील आर्मी व्हाइव्ज वेल्फेअर असोसिएशनच्या प्रादेशिक अध्यक्षा झरिना हरिझ यांच्या हस्ते झाले. सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या पत्नी उषा पवार आणि उज्ज्वला बिंद्रा उपस्थित होत्या. लष्कर आणि नौदलाच्या बॅंडचे सादरीकरण झाले. या कार्निव्हलमध्ये सैन्यदलातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे. त्यात रॉकेट लॉंचरपासून ते मशिन गनपर्यंत लष्करात वापरली जाणारी शस्त्रास्त्रे आणि वेगवेगळी युद्धसामग्री पाहता येईल. त्याशिवाय वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये खाद्यभ्रमंती आणि खरेदी करता येईल. कपड्यांसह कलाकुसरीच्या वस्तू खरेदी करता येतील. "सकाळ' हे या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. 19) रेंजहिल्स येथील (सिंचननगरजवळ) कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत पाहावयास खुले आहे. 

मोबदला जवानांच्या मदतीसाठी 
"ऋण कार्निव्हल'मधून जमा होणारा आर्थिक मोबदला जायबंदी झालेल्या जवानांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस नाममात्र 50 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. सीमेवर लढताना आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी जवानांना मदतीचा हात देऊन आपले कर्तव्य बजावणे शक्‍य आहे. त्याची ही एक संधी आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी या कार्निव्हलला भेट द्यावी. तसेच, जवानांप्रती आपली जबाबदारी समजून रविवारी (ता. 19) होणाऱ्या "ऋण मॅरेथॉन'मध्ये सहभागी व्हावे. 

सैन्यदलातील जवानांसाठी आपला पाठिंबा आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. हीच आपली जबाबदारी व कर्तव्यही आहे. याच जबाबदारीचे भान ठेवून आपण त्यांच्यासाठी पुढे येऊन मदतीचा हात दिला पाहिजे. कुठेतरी त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांना मदत करणे आणि पाठिंबा देणे हीच त्यांच्या शौर्याला आणि कार्याला आपल्याकडून सलामी असेल. 
- झरिना हरिझ, प्रादेशिक अध्यक्षा, आर्मी व्हाइव्ज वेल्फेअर असोसिएशन, लष्कर दक्षिण मुख्यालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com