फुलराणीचा वाढदिवस उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

केक कापून महापौर मुक्ता टिळक यांनी लुटला प्रवासाचा आनंद

केक कापून महापौर मुक्ता टिळक यांनी लुटला प्रवासाचा आनंद
पुणे - 'गाडी आली, गाडी आली झुक झुक झुक, शिट्टी कशी वाजे पाहा, कुक कुक कुक', "झुकू झुकू झुकू झुकू अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी'... या कविता म्हणत शनिवारी बालचमूंसह आबालवृद्धांनी पेशवे उद्यानातील फुलराणीचा 61 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. केक कापून महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे यांनीही बालगोपाळांसोबत फुलराणीतून फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.

पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने फुलराणीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी संवाद पुणेचे सुनील महाजन, नितिका मोघे, नगरसेवक धीरज घाटे, माजी नगरसेवक गोपाळ चिंतल, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे उपस्थित होते. उद्यानातील फुलराणीचे 8 एप्रिल 1956 ला उद्‌घाटन झाले होते. त्या वेळच्या प्रवासी असलेल्या सुगंधा शिरवळकर, सीमा देव आणि बाबूलाल रासकर यांनी गतकाळातल्या आठवणींना उजाळा दिला. एकलव्य संस्थेच्या मुलांना महापौरांच्या हस्ते 61 गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका रेणू गावस्कर उपस्थित होत्या.

टिळक म्हणाल्या, 'व्यक्तीच्या आयुष्यात एकसष्टीला विशेष महत्त्व असते; तसेच फुलराणीच्या बाबतीतही आहे. बालगोपाळांचे आकर्षण असलेली फुलराणी एकसष्टीची झाली आहे. बालगोपाळांसह सर्वांनाच फुलराणीत बसायला आवडते. मीदेखील लहानपणी फुलराणीत बसायला यायचे. महापालिकेतर्फे फुलराणीची शान वाढविण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करण्यात येतील.''

शिरवळकर म्हणाल्या, 'फुलराणीचा उद्‌घाटनप्रसंग मला आठवतो. तेव्हा मी तीन वर्षांची होते. त्या वेळी वाडा संस्कृती होती. माझ्या सवंगड्यांसोबत मी फुलराणीतून प्रवास केला होता.'' रासकर म्हणाले, 'फुलराणीचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून मी महाबळेश्‍वरवरून आलो. फुलराणीच्या उद्‌घाटनाच्या दिवशी माझ्या वडिलांसोबत मी सायकलवर सकाळी सात वाजता आलो होतो. नऊ वाजताची वेळ दिली होती. पण फुलराणीच्या उद्‌घाटनाला एक तास उशीर झाला. जेव्हा फुलराणी बोगद्यातून जात होती, तेव्हा आम्ही मुलांनी एकच जल्लोष केला होता.''

Web Title: fulrani birthday celebration