शिक्षकांच्या पुरवणी बिलासाठी 26 कोटी 16 लाखांचा निधी

संतोष आटोळे
बुधवार, 11 एप्रिल 2018

शिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विभागातील आस्थापना, व बालवाडीच्या कर्मचाऱ्यांची गेल्या वर्षभरापासुन प्रलंबित असलेली विविध पुरवणी बिले मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असुन यासाठी तब्बल 26 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते व उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील यांनी दिली.

शिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विभागातील आस्थापना, व बालवाडीच्या कर्मचाऱ्यांची गेल्या वर्षभरापासुन प्रलंबित असलेली विविध पुरवणी बिले मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असुन यासाठी तब्बल 26 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते व उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसह केंद्रप्रमुख, शिक्षण विभाग कार्यालयातील विविध पदांवर काम करणारे कर्मचारी, बालवाडीच्या कर्मचारी यांची गेल्या वर्षभरापासुन वैद्यकिय बिले, वेतनवाढ फरकाची बिले, दिर्घमुदतीची रजा बिले, प्रसुती रजा बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक बिले, एकस्तरची फरक बिले यांसारखी विविध प्रकारणी बिले आर्थिक तरतुदी अभावी थकित होती.

यामुळे शिक्षकांची मोठी आर्थिक हेळसांड होत. या बिलांसाठी शिक्षकांना गेली अनेक दिवस वाट पाहवी लागली यामुळे सदर बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात येत होती त्यानुरुप जिल्ह्यातील तेरा तालुक्यांसाठी व प्राथमिक व माध्यमिक आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांच्यासाठी तब्बल 26 कोटी 16 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. यामध्ये मागणीनुरुप सर्वाधिक निधी 7 कोटी 20 लाख 22 हजार रुपये खेड तालुक्यासाठी मंजुर करण्यात आला आहे. या मंजुर झालेल्या निधीमुळे शिक्षकांची अनेक दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या वेतनेतर बिलांचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

दत्तात्रय वाळुंज (माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ)
गेल्या वर्षापासुन शिक्षकांची विविध बिले प्रलंबित होती त्यास जिल्हा परिषदेकडुन निधी मंजुर करण्यात आल्याने सर्व पदाधिकारी, अधिकारी यांचे आभार व्यक्त करीत आहे. तसेच यांमुळे शिक्षकांचा रखडलेल्या आर्थिक प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय निधी खालीलप्रमाणे
1) आंबेगाव - 1 कोटी 7 लाख 17 हजार,
2) बारामती -  1 कोटी 2 लाख 97 हजार,
3) भोर - 1 कोटी 2 लाख 95 हजार,
4) दौंड  - 1 कोटी 24 लाख 89 हजार,
5) हवेली - 2 कोटी 2 लाख 76 हजार,
6) इंदापूर - 1 कोटी 25 लाख 95 हजार,
7) जुन्नर - 5 कोटी 86 लाख,
8) खेड - 7 कोटी 20 लाख 22 हजार,
9) मावळ - 1 कोटी 4 लाख 83 हजार,
10) मुळशी - 1 कोटी 27 लाख 61 हजार,
11) पुरंदर - 1 कोटी 5 लाख 66 हजार,
12) शिरुर - 1 कोटी 26 लाख 78 हजार,
13) वेल्हा - 60 लाख 6 हजार,
शिक्षण प्राथमिक - 7 लाख 93 हजार
शिक्षण माध्यमिक - 11 लाख 15 हजार

एकूण - 26 कोटी 16 लाख 97 हजार रुपये.

Web Title: Fund sanctioned for supplementary bills of Teaches in Pune District