फुरसुंगी परिसरात अतिक्रमणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

फुरसुंगी - राष्ट्रीय महामार्ग विभागाने तुकाईदर्शन भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांवर कारवाई केली. 

मात्र काही महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने एकत्र येत कारवाईला विरोध करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच आमच्यावर ॲट्रासिटीखाली गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍याही दिल्या. पोलिसांची आणखी कुमक मागविल्यावर हा जमाव पांगला, असे अतिक्रमण विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले. सासवड रस्त्यावर दिवसभर मोठी जड वाहतूक सुरू असते. तेथील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे कोंडीत भर पडत होती. त्यामुळे फुरसुंगी ग्रामपंचायतीने येथील अतिक्रमणे काढण्याची लेखी मागणी राष्ट्रीय मार्ग विभागाकडे केली होती. त्यानुसार या विभागाचे अधिकारी अशोक गिरमे व त्यांचे पाच अन्य अधिकारी, पोलिस यांच्या उपस्थितीत सत्यपूरमपासून अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली. 

ग्रामपंचायतीने पुरवलेले दोन जेसीबी, दोन ट्रॅक्‍टर, दहा कर्मचारी यांच्या मदतीने काम सुरू केले. सत्यपूरम ते ग्रामपंचायत कार्यालय या सुमारे एक किलोमीटर भागातील अतिक्रमण केलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पक्‍क्‍या बसवलेल्या दहा टपऱ्या, चायनीजचे तीन मोठे स्टॉल, अनेक दुकानांसमोरचे पक्के ओटे, छोट्या भिंती, मोठे दहा फ्लेक्‍स, फळांचे अनधिकृत स्टॉल, हातगाड्या यावर कारवाई करून सर्व माल जप्त करण्यात आला. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना पंधरा मीटरच्या आत जी अतिक्रमणे होती, ती सर्व तोडण्यात आली. सकाळी अकरा ते सायंकाली उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सर्व अतिक्रमणे काढून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सासवड रस्त्यावरील भेकराईनगर ते मंतरवाडी चौक या सुमारे तीन किलोमीटर अंतरातील दोन्ही बाजूंची अतिक्रमणेही तातडीने काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिनाभरापूर्वीच फुरसुंगी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सर्व अतिक्रमणे काढली होती. मात्र पुन्हा ती झाल्याने व त्याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे तक्रार केल्याने आजची कारवाई करण्यात आली.