खडकीत डीजेमुक्त मिरवणूक

DJ
DJ

खडकी - उच्च न्यायालयाने दिलेल्या डीजे बंदीच्या आदेशामुळे खडकीतील बहुतेक गणेश मंडळांनी ढोल ताशा पथकांना पसंती दर्शवत वाजत गाजत मिरवणुका काढल्या.

फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून खडकीतील नवा बाजार गणेश मंडळाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेली उंटांची जोडी लक्ष वेधून घेत होती. मानाचा पहिला नवी तालिम नूतन तरुण मंडळाचा गणपती फुलांनी सजवलेल्या मोराच्या रथात विराजमान झाला होता. मानाचा दुसरा मधला बाजार मित्र मंडळाच्या गणपती मिरवणुकीतील ढोल पथकाच्या वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मित्र सागर मंडळानेही फुलांचा रथ तयार केला होता. या मिरवणुकीत पारंपरिक वस्त्र परिधान केलेले कार्यकर्ते तसेच मंडळाच्या जिवंत देखाव्यातील कलाकार वेशभूषेसह सहभागी झाले होते. व्यापारी मंडळाच्या १७ फुटी गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल ताशा पथकात मुलींचा सहभाग लक्षणीय होता. गवळीवाडा तरुण मित्र मंडळ, जुनी तालिमचा गणपती गज रथात विराजमान झाला होता. मानाजीबाग, रेंजहिल्स, साप्रस, मुळारोड आदी भागांतही मिरवणूक काढण्यात आली. गांधी चौकात हिंदू युवक संघटनेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. त्यामध्ये खडकी कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, नगरसेवक सुरेश कांबळे, संघटनेचे अध्यक्ष दादा कचरे आदी गणेश मंडळांचे फूल व श्रीफळ देऊन स्वागत करत होते. बाजार परिसरात दिवसभरात डीजे कुठेही वाजला नाही.

मात्र मुळारोड, रेंजहिल्स आदी भागातील मंडळांनी डीजे लावण्याचा प्रयत्न केला. त्यांचे डीजेचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. घाट परिसरातही पोलिस व खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी तैनात होते. वैद्यकीच पथकाची व्यवस्थाही होती. विसर्जनासाठी घाटावरील कृत्रिम हौदाकडे भाविकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.

मारहाणीने गालबोट
सकाळपासून सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीला रात्री आठच्या सुमारास घडलेल्या दोन घटनांनी गालबोट लागले. एका घटनेत मंडळाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीत पोलिस नाईक बबुवान पांडुरंग थेटे यांना अभिजित बाळू क्षीरसागर (रा. दर्जी गल्ली, जुना बाजार ), सुफेन तांबोळी, प्रशांत काळे यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून क्षीरसागरला अटक करण्यात आली. 

खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. के. गोरे अधिक तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत रात्री आठच्या सुमारास गांधी चौकातील हिंदू युवक संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षाच्या स्टेजवर खडकी कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, नगरसेवक सुरेश कांबळे, दुर्योधन भापकर, संघटनेचे अध्यक्ष दादा कचरे आदींवर डेपो लाईन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काळा बुक्का उधळला. यामुळे गोंधळ उडाला व स्टेज खाली कोसळले. यामध्ये चासकर, कांबळे आदींना दुखापत झाली.

याप्रकरणी चासकर यांनी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून डेपो लाइन मंडळाचे अध्यक्ष शैलेश गर्गे, अक्षय ऊर्फ बंडू शिंदे, गणेश गाडे, चेतन गाडे, मिलिंद खाडे, जहांगिर यांच्यासह मंडळाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चेतन अनिल गाडे (वय २७) महेश भगवान केरकर, ( वय ३०), मिलिंद श्रीरंग खाडे (वय २३, रा. डेपो लाइन ) व अक्षय शिंदे (वय २८, रा. जुना बाजार) यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम. जी. करपे करीत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com