आता बोलबाला गावरान हापूसचाच ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला असून, आता गावरान हापूसची गोडी चाखण्यास मिळू लागली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील या गावरान हापूसची मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात आवक वाढू लागली आहे. 

पुणे - कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला असून, आता गावरान हापूसची गोडी चाखण्यास मिळू लागली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील या गावरान हापूसची मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात आवक वाढू लागली आहे. 

फळांचा राजा असलेल्या आंब्यात कोकणातील हापूस आंबा हा चवीला सर्वोत्तम मानला जातो. या आंब्याचा हंगाम आता संपत आला असून, गावरान हापूसची आवक आता सुरू झाली आहे. त्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आदी भागांतील शेतकरी आंब्याचे उत्पादन घेतात. रायवळ हा आंबा या भागात मोठ्या प्रमाणावर पिकत असून, अलीकडील काळात या झाडाला कोकणातील हापूस आंब्याचे कलम लावून, गावरान हापूसचे उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. आकाराने लहान आणि चवीला गोड, रंग हापूस आंब्याप्रमाणेच अशी वैशिष्ट्ये या आंब्याची आहे. गावरान हापूस, रायवळ प्रमाणेच गावरान पायरीचादेखील एक ग्राहक वर्ग आहे. "राजापुरी' या प्रकाराच्या कैरीचे कलम करून उत्पादन घेतले जात आहे. या कैरीला चांगला भाव मिळत आहे. या गावरान हापूस आंब्याचा हंगाम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत राहील, असा अंदाज आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत या आंब्याचे भाव कमी असतात. 

माझी पंचवीस झाडे असून, यामध्ये हापूस, पायरी या आंब्याचा समावेश आहे. आमच्या भागात कलम केलेल्या आंब्याचे उत्पादन वाढत आहे. कलम केल्यानंतर तीन ते चार वर्षांत झाडाला चांगली फळधारणा होते. 
- लक्ष्मण कुडले, शेतकरी, कोंढूर 

विक्रीसाठी जागेचा प्रश्‍न 
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दरवर्षी शेतकरी आंब्याची विक्री करतात. यावर्षी मात्र, त्यांना मनाई केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळच आंबा विक्री करू देण्याची मागणी केली आहे. बाजार समितीने त्यांना पर्यायी जागा देण्याची तयारी दाखविली आहे. याबाबत समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे म्हणाले, ""यापूर्वी जांभूळ आणि करवंद विक्रीला मनाई केली आहे. सगळ्यांना समान न्याय म्हणून प्रवेशद्वार क्रमांक चार जवळ असलेल्या मोकळ्या शेडच्या जागेत गावरान हापूस विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल.'' 

Web Title: Gavran hapus mango in market