मुख्यमंत्र्यांनी मेट्रोतील त्रुटींचे पुरावे द्यावेत  - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे -  ""मेट्रो प्रकल्पाच्या अहवालात 250 त्रुटी काढल्या होत्या, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे पुरावे द्यावेत,'' असे आव्हान देत "अडीच वर्षे तुम्ही काय करीत होता?,' असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. 

पुणे -  ""मेट्रो प्रकल्पाच्या अहवालात 250 त्रुटी काढल्या होत्या, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे पुरावे द्यावेत,'' असे आव्हान देत "अडीच वर्षे तुम्ही काय करीत होता?,' असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. 

पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात मेट्रो प्रकल्पाच्या विलंबास तत्कालीन आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मेट्रो प्रकल्पाच्या अहवालात आघाडी सरकारने 250 त्रुटी काढल्याने फाइल मंत्रालयातच फिरत राहिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज अजित पवार यांच्या हस्ते 

प्रसिद्ध करण्यात आला. पत्रकारांनी या संदर्भात पवार यांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपावर पवार यांनी टीका केली. 

पवार म्हणाले, ""आम्ही एवढ्या त्रुटी काढल्या असे ते म्हणत असतील, तर त्यांनी त्याची यादी द्यावी, असे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे. आम्ही आमच्या काळात या प्रस्तावावर चर्चा करून निगडी ते कात्रज या मार्गाला मंत्रिमंडळाची मान्यता दिली. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर मंजुरी देण्यासाठी अडीच वर्षे का लागली?'' 

मेट्रो प्रकल्पास मंजुरी मिळावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्याचे पवार यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, ""शरद पवार यांनीदेखील नितीन गडकरी यांची भेट घेतली. विकासकामात राजकारण आणायचे नाही, ही आमची भूमिका आहे; परंतु केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेत आहे. पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निवडणुका जवळ आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला.'' 

गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने अनेक विकासकामे केली. बहुमत नसल्यामुळे अनेकदा अन्य पक्षांनाही बरोबर घ्यावे लागले. पाच वर्षांच्या काळात आमच्या पक्षाच्या एकाही नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, याची दखलही पुणेकर घेतील, असेही त्यांनी सांगितले 

शिक्षण मंडळाबाबत पवार म्हणाले, ""शिक्षण मंडळ बंद करा असा आग्रह मीच धरला होता; परंतु विनोद तावडे यांनी त्याला स्थगिती दिली.'' 

जुने कार्यकर्ते वाऱ्यावर 
राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, ""जे कार्यकर्ते जनसंघापासून काम करीत आहेत, राममंदिराच्या उभारणीसाठी झटत आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जात आहे. शहरात आठ आमदार, दोन खासदार असतानादेखील त्यांच्या टीमवर पक्षाचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळेच वेगवेगळी आमिषे दाखवून दुसऱ्या पक्षांतील लोकांना फोडण्याचे काम केले जात आहे. निवडणुकीचा खर्च करू, अशी आश्‍वासनेही दिली जात आहेत.'' 

Web Title: Giving evidence to the Chief Minister metrotila errors