भाजपमध्ये वाढले गटातटाचे राजकारण

भाजपमध्ये वाढले गटातटाचे राजकारण

पुणे - एकेकाळी शिस्तबद्ध राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात गटातटाचे राजकारण आणि पक्षांतर्गत लाथाळ्या वाढल्याचे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. शहकटशहाचे राजकारण करीत प्रतिस्पर्धी गटांतील उमेदवारांना पाडल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर हे पक्षांतर्गत वादाचेच ‘बळी’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून, त्यापाठोपाठ कर्वेनगरमधील भाजपच्या महिला उमेदवारालाही पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर भाजपमध्ये पक्षांतराचा जोर वाढला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत तो कायम होता. विविध राजकीय पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांचा पुढाकार होता. दरम्यान गुंड प्रवृत्तीच्या इच्छुकांना पक्षात घेण्यावरून बापट आणि काकडे यांच्यातील गटातटाचे राजकारण उघड झाले. शहर भाजपमध्ये आपले वर्चस्व वाढविण्यासाठी काकडे नेहमीच प्रयत्नशील होते. या घडामोडी सुरू असतानाच पालकमंत्र्यांच्या कसबा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना भाजपमध्ये घेऊन बापट यांनाच आव्हान देण्याची व्यूहरचना पक्षात आखण्यात आली. मात्र धंगेकरांच्या भाजप प्रवेशाला बापट यांच्यासह बिडकर यांनी तीव्र विरोध केला होता. या पार्श्‍वभूमीवर धंगेकर यांना बळ देण्यात पक्षातील काहींनी पुढाकार घेतल्याची आणि त्यात काही बापटसमर्थकही असल्याची चर्चा आहे. 

कर्वेनगर (प्रभाग क्र. ३१) मधील भाजपच्या उमेदवार रोहिणी भोसले यांनाही पक्षांतर्गत राजकारणामुळेच पराभव पत्करावा लागल्याची चर्चा आहे. भोसले यांच्या उमेदवारीवरूनही प्रचंड गोंधळ झाला होता. भोसले यांना उमेदवारी मिळण्यासाठी एका आमदारांनी प्रयत्न केले होते. मात्र त्या आमदारांना पक्षाच्या एका नेत्याचा विरोध असल्याने भोसले यांना पक्षातूनच विरोध झाला आणि त्यातून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी भोसले यांचे काम केले नसल्याची चर्चा आहे. आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाण (प्रभाग क्र. ४०) मधील भाजपचे उमेदवार अभिजित कदम यांनाही गटातटांचा फटका बसल्याचे पक्षातील काही सूत्रांकडून सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com