‘जीएसटी’ची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा

‘जीएसटी’ची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा

पुणे - विविध अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण करून त्याचे वस्तू व सेवा करात (जीएसटी) रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीची नोंदणी आणि स्थलांतराची प्रक्रिया चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, अनेक व्यापारी, उद्योजक आणि सेवाक्षेत्रातील करदात्यांनी आवश्‍यक कागदपत्रे देऊन ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही.

‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर आपला व्यापार- उद्योग अडथळ्याविना चालण्याच्यादृष्टीने संबंधितांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवाकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्याधर थेटे यांनी केले आहे.

देशभरातील व्यापारी, उद्योजक आणि करदात्यांना १ जुलै २०१७ पासून ‘जीएसटी’ लागू होण्याची शक्‍यता आहे. या सर्वांना पहिल्या दिवसापासून नोंदणी क्रमांक देता यावा, यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून, अद्याप बहुसंख्य करदात्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ‘इनपुट टॅक्‍स क्रेडिट’ मिळण्यासाठी आणि विक्रीची बिले देण्यासाठी ‘जीएसटी’ अंमलबजावणीच्या वेळी नोंदणी क्रमांक मिळणे, हे व्यापाऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. नोंदणी न करणाऱ्यांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पुणे विभागांतून केवळ २.८२ टक्के सेवाकरदात्यांचे, तर ३.१७ टक्के उत्पादन शुल्क करदात्यांचे स्थलांतर झाले असून, अनेक व्यापारी, उद्योजक आणि सेवाक्षेत्रातील करदात्यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे देऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशी माहिती थेटे यांनी दिली. सहायक आयुक्त सार्थक सक्‍सेना हेही या वेळी उपस्थित होते.

उत्पादन शुल्क करदात्यांपैकी ४ हजार २९० करदात्यांना तात्पुरते ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, फक्त १३६ करदात्यांचे स्थलांतर झाले असून, त्यापैकी फक्त २२ करदात्यांचेच ‘जीएसटी’मध्ये वर्गीकरण झाले आहे. विक्रीकर विभागातर्फे उर्वरित करदात्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
- विद्याधर थेटे, अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवाकर विभाग

अडीच हजार करदात्यांचे वर्गीकरण
अतिरिक्त आयुक्त विद्याधर थेटे म्हणाले, ‘‘पुणे विभागाअंतर्गत पुणे, कोल्हापूर आणि गोवा राज्यांचा समावेश होतो. आतापर्यंत सुमारे ८६ हजार दोन सेवाकरदात्यांनी तात्पुरत्या ओळख क्रमांकासाठी (प्रोव्हिजनल आयडी) संपर्क साधला असून, त्यापैकी १६ हजार ५६१ करदात्यांनी तात्पुरते ओळख क्रमांक काढून घेतले आहे. त्यापैकी फक्त २ हजार ४२५ करदात्यांचे ‘जीएसटी’मध्ये वर्गीकरण झाले आहे.’’

जीएसटी स्थलांतर सेवा केंद्र स्थापन
अधिकाधिक करदात्यांनी ओळख क्रमांक किंवा ओळखपत्रे काढून घ्यावीत, यासाठी पुणे विभागातर्फे जीएसटी स्थलांतर सेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्याचा करदात्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही विद्याधर थेटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. पुणे आयुक्‍तालय - ०२०- २७६५५८६६ आणि २७६५५८६७, ९७६५०८०१९८, कोल्हापूर आयुक्तालय - ०२३१- २५३०५७५ आणि २५३०२४०, गोवा आयुक्तालय - ९४२३३०७७९४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com