मांगल्य अन्‌ चैतन्याची गुढी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पुणे - ‘चंदनाच्या काठीवर, 
शोभे सोन्याचा करा, 
साखरेची गाठी आणि 
कडुनिंबाचा तुरा, 
मंगलमय गुढी, 
ल्याली भरजरी खण, 
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण’ अशा शब्दांची गुंफण करीत शनिवारी नागरिकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू नववर्षाचे स्वागत चैतन्य व उत्साहाने करून घरोघरी सकाळी आनंदाची गुढी उभारली. पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब गुढी उभारून पाडव्याला नव्या संकल्पाची सुरवात करण्यात आली. 

पुणे - ‘चंदनाच्या काठीवर, 
शोभे सोन्याचा करा, 
साखरेची गाठी आणि 
कडुनिंबाचा तुरा, 
मंगलमय गुढी, 
ल्याली भरजरी खण, 
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण’ अशा शब्दांची गुंफण करीत शनिवारी नागरिकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू नववर्षाचे स्वागत चैतन्य व उत्साहाने करून घरोघरी सकाळी आनंदाची गुढी उभारली. पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब गुढी उभारून पाडव्याला नव्या संकल्पाची सुरवात करण्यात आली. 

चैत्र शुद्ध प्रतिपदेची सुरवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला घराघरांवर तसेच, ‘फ्लॅट’च्या खिडक्‍यांवर गुढ्या उभारण्यात आल्या. दारासमोर आकर्षक रांगोळी आणि देवघराला फुलांनी सजविण्यात आले होते. कुलदैवतांची षोडशोपचारे पूजाअर्चा करून सकाळी साडेआठनंतर घरोघरी पारंपरिक रीतीरिवाजानुसार गुढी उभारली. आनंदाचे, मांगल्याचे आणि चैतन्याचे वातावरण घराघरांमध्ये होते. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळपासूनच घराघरांत गुढीपूजनाची लगबग सुरू होती. 
विजय आणि सामर्थ्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीची नागरिकांनी मनोभावे पूजन केले. नवे वस्त्र, दवणा, आंब्याची-कडुलिंबाची पाने, बांबूची काठी आणि फुलांचा हार, अशा वस्तूंनी गुढी उभारण्यात आली. पाडव्यासाठी पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, रसमलाई, गुलाबजाम, अंगूरमलई, अशा गोड पदार्थांचा बेतही घराघरांमध्ये होता. 

मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होती. मंदिरांमध्येही पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी घरात चैतन्य आणि मांगल्य नांदावे, अशी प्रार्थना केली. काही सामाजिक संस्थांनी विविध उपक्रमांतून वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला. सायंकाळपर्यंत पाडव्याचा आनंद व हर्ष घरांमध्ये पाहायला मिळाला. काही सोसायट्यांमध्ये नागरिकांनी एकत्र येऊन गुढी उभारून एकतेचा संदेश दिला. 

चिमुकल्यांकडून पाटी पूजन 
पुणे - आधी अक्षरवळण आणि पश्‍चात शुद्धलेखन, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे आज गुढीपाडव्यानिमित्त चिमुकल्या हातांनी पाटीची पूजा करून त्यावर वळणदार अक्षराचे धडे गिरविण्याचा प्रयत्न प्रभुकृपा बालक मंदिरातील विद्यार्थ्यांनी केला. 

खरेदीसाठी झुंबड
गृहोपयोगी, तसेच मौल्यवान वस्तूंच्या खरेदीचाही आनंद नागरिकांनी लुटला. शहराच्या विविध भागांत आयोजित केलेल्या मिरवणुकांमध्येही पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. पाडव्याच्या मुहूर्ताला खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. दुचाकी खरेदीपासून ते सोन्याच्या खरेदीचा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा मुहूर्त अनेकांनी गाठला. काहींनी इलेक्‍ट्रॉनिक आणि इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

शुभेच्छांचा वर्षाव
फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हाईक आणि व्हॉट्‌सॲपवरही सकाळपासूनच मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा नेटिझन्स एकमेकांना देत होते. घरात उभारलेल्या गुढीचे छायाचित्र पोस्ट करत नेटिझन्संनी आपल्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या. विविध संदेश, छायाचित्र आणि व्हिडिओ शेअर करून त्यांनी सर्वांच्या आयुष्यात मांगल्य व आनंद नांदण्याची कामना केली.

Web Title: gudhipadava celebration