गुरुकुलमला ‘अच्छे दिन’

संदीप घिसे
शनिवार, 16 जून 2018

पिंपरी - गतवर्षी सप्टेंबर महिन्यात एक लाखाचे वीजबिल न भरल्यामुळे चिंचवडगाव येथील चापेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या निवासी आश्रमशाळेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला होता. ही संस्था अडचणीत सापडल्याची बातमी (२३ सप्टेंबर २०१७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत एका खासगी कंपनीने, १५ लाख रुपयांचा सौरऊर्जेचा प्रकल्प या संस्थेला भेट दिला. दरमहा चाळीस हजारांची वीजबचत होत असल्याने आता गुरुकुलमला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

गुरुकुलम या विनाअनुदानित निवासी आश्रमशाळेत भटक्‍या समाजातील ३२९ मुले व मुली शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणाशिवाय सुतारकाम, मूर्तिकाम, पणत्या, आकाशकंदील, बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विजेवर चालणारी अनेक उपकरणे आहेत, त्यामुळे दरमहा ४० हजार इतके वीजबिल येते. 

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात, एक लाख रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने येथील वीजपुरवठा १५ दिवस खंडित केला होता. नदीकिनारी हा आश्रम असून, त्यात लहान मुले राहत असल्याने शिक्षकांचा पगार थांबवून त्यातून एक लाखाचे वीजबिल भरले. शिक्षकांचे पगार कोठून द्यायचे, असा प्रश्‍न संस्थेसमोर असतानाच महापालिकेने सहा लाख रुपयांचा मिळकतकर न भरल्यास आश्रमशाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. जर आश्रमशाळा सील केली तर मुलांना कुठे ठेवायचे, असा प्रश्‍न संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्यासमोर निर्माण झाला. संस्थेच्या या आर्थिक अडचणींबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे दानशूर व्यक्‍ती पुढे आल्या आणि त्यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांची मदत गुरुकुलमला मिळाली.

दैनंदिन खर्चाचा प्रश्‍न सुटला तरी वाढत्या वीजबिलाचा खर्च कायम होता. त्यांची ही समस्या जाणून एका खासगी कंपनीने त्यांना सौरऊर्जेचा प्रकल्प देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आता १५ लाख रुपये खर्चून त्या कंपनीकडून २० किलोवॉटचा प्रकल्प उभारला. त्यामुळे विजेचा प्रश्‍न कायमचा सुटला आहे. रात्रीच्या वेळीही येथील परिसर उजाळून निघाला आहे.

‘सकाळ’ने आमची व्यथा मांडल्यानंतर दहा लाख रुपयांची मदत संस्थेला झाली. एका खासगी कंपनीने सौरऊर्जेचा प्रकल्प दिल्याने वीजबिलाचा प्रश्‍न मिटला आहे. यामुळे ‘सकाळ’ आणि त्यांच्या वाचकांचा मी आभारी आहे.
- गिरीश प्रभुणे, संस्थापक अध्यक्ष, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम

Web Title: gurukulam residence school solar power