डेंगी, मलेरियाने हडपसरकर जर्जर

हडपसर - जुन्या मुळा-मुठा बंद कालव्याचे गटार झाले आहे. त्यामुळे डासांचे व आजारांचे प्रमाण वाढले आहे.
हडपसर - जुन्या मुळा-मुठा बंद कालव्याचे गटार झाले आहे. त्यामुळे डासांचे व आजारांचे प्रमाण वाढले आहे.

हडपसर - डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड, ताप आणि सर्दी-खोकला आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत. सर्व खासगी रुग्णालये सध्या रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात साथीच्या रोगाची शिकार बनलेल्या गरीब रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, आरोग्य विभाग झोपा काढत आहे का, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. या बाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून या साथींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही ठोस उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

खासगी दवाखान्यात चिकुनगुनिया, डेंगी, मलेरिया, टायफॉईड, सर्दी, खोकला या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या रुग्णालयांना चांगले दिवस आहेत. एकीकडे प्रशासन सुस्त तर रुग्ण त्रस्त अशी परिस्थिती हडपसरमध्ये पहावयाला मिळत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेक औषधे उपलबध नसतात, अशा तक्रारी नागरिकांकडून वाढल्या आहेत.

फुरसुंगी, देवाची उरूळी, साडेसतरा नळी, केशवनगर ही गावे नव्याने पालिकेत समाविष्ट झाली. हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत ही गावे आहेत. मात्र, पुरेशा मनुष्यबळा अभावी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये किटकनाशक फवारणी झालेली नाही. तसेच नियमितपणे कचरा उचलला जात नाही. या गावांकडे ग्रामपंचायत व महापालिकाही लक्ष देत नाही. त्यामुळे साथीचे आजार दिवसेंदिवस बळावत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे मलेरिया निरीक्षक अण्णा बांदल म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत हद्दीतील रुग्ण हडपसरमध्ये उपचारासाठी येतात. त्यामुळे साथ पसरते. झोपडपट्ट्यांपेक्षा बंगले, मोठ्या सोसायट्यांतील स्वीमिंग टॅंक, टेरेसे, कुलर, पाण्याच्या टाक्‍या, कुंड्या, अर्धवट व पडीक बांधकामे यामध्ये साठलेल्या पाण्यामुळे डास उत्पत्ती अधिक होत आहे. संबंधित ठिकाणी आम्ही कीटकनाशक फवारतो तसेच दंड व नोटिसा देऊन कारवाई करतो. मात्र, नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.

आरोग्य खात्याकडे मनुष्यबळाचा अभाव
सर्वात मोठी हद्द असलेले हे कार्यालय आहे. आरोग्य विभागाकडे अगोदरच मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना अनेक अडचणी येतात. या कार्यालयातील आरोग्य विभागाने नवीन ८० कर्मचारी मिळावेत, अशी विनंती वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. 

आम्ही महापालिकेला प्रामाणिकपणे कर भरतो, मग आम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा का नाहीत? या भागात पालिकेचे एकही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल का होऊ शकत नाही? प्रशासन गोरगरिबांच्या जिवाशी खेळताना दिसत आहे. सर्वच प्रभागांत आजाराने थैमान घातले आहेत. प्रत्येक घरातील सदस्य आजारी असल्याचे दिसून येत आहे.
- चंद्रकात सत्ते, नागरिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com