निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची पिकांची राखरांगोळी झाली आहे. लोकप्रतिनिधीने तालुक्‍याचे वाटोळे केल्याचा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची पिकांची राखरांगोळी झाली आहे. लोकप्रतिनिधीने तालुक्‍याचे वाटोळे केल्याचा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.

निमसाखर (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, पंचायत समिती सदस्या सुवर्णा रणवरे, सरपंच अरुणा चव्हाण, उपसरपंच गौरी संजय जाधव, माजी सभापती विलास वाघमोडे, नीरा भीमाचे संचालक रणजित पाटील, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, ज्ञानदेव बोंद्रे, राजेंद्र गायकवाड, अनिल बोंद्रे, आबासाहेब शिंगाडे, भरत बोराटे आदी उपस्थित होते.

 पाटील म्हणाले, की खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्‍यासाठी ४० हजार एकरांसाठी पाणी येत होते. सणसर कटमधूनही ३.९ टीएमसी पाणी मिळत होते. भाटघर धरणाच्या पाण्यावर इंदापूर तालुक्‍याचा हक्क आहे.  मात्र, साडेतीन वर्षांमध्ये पाण्याची वाट मोडली आहे. धरणामध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. कालव्याचे पाणी कुठे जात आहे, याचा शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. उन्हाळी हंगामात पाणी मिळण्यास विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमचं जळत आहे म्हणून आम्ही पोटतिडकीने बोलत आहोत. मात्र, लोकप्रतिनिधी नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करताना हसून शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत. पाण्याअभावी साडेतीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे संसार उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अशा प्रवृत्तीला सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठेचून काढण्याची गरज आहे. 

गावागावांत भांडणे
लोकप्रतिनिधीने गावागावांत, कुटुंबांमध्ये, दोन समाजांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. राज्यामध्ये इंदापूर तालुक्‍याचे नाव खराब केले. त्यांची अधिकाऱ्यांबरोबर बोलण्याची भाषा असंस्कृत आहे. अंथुर्णे येथील आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.

उद्योजकांकडे खंडणी
लोणी एमआयडीसीमधील उद्योजकांना संरक्षण मिळत नाही. त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. साडेतीन वर्षांमध्ये नवीन प्रकल्प येण्याचे थांबले असून, विस्तारवाढही थांबली आहे. पूर्वी एका कंपनीमध्ये आठशे ते हजार मुले काम करीत होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून, बेरोजगारी वाढल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.

Web Title: Harsh Vardhan Patil in walchandnagar