भिगवणला मृग नक्षत्राच्या दमदार पावसाची हजेरी

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 8 जून 2018

रोहिणी व मृग नक्षत्राच्या जोडीवर भिगवण व परिसरामध्ये पहिला पाऊस झाला व त्यानंतर लगेचच दोन दिवसाने शुक्रवारी (ता.08)  सायंकाळी मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बळिराजा काहीसा सुखावला.

भिगवण : भिगवण परिसरातील मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ(ता.इंदापुर) येथे शुक्रवारी(ता.08) सायंकाळी पाचच्या सुमारास मृग नक्षत्राच्या दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या दमदार पावसाने हवेतील उकाडा कमी झाला असून, शेतातील कोमेजून चाललेल्या पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

यंदा भिगवण परिसरात पावसाचे वेळेत आगमन झाले. रोहिणी व मृग नक्षत्राच्या जोडीवर पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. उजनी जलाशयातील पाणी खोलवर गेल्यामुळे व विजेच्या लपंडावामुळे शेतातील पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. अशावेळी पावसाने हात दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये सुरवातीचे काही दिवस वादळी वारे सुरु झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती.

रोहिणी व मृग नक्षत्राच्या जोडीवर भिगवण व परिसरामध्ये पहिला पाऊस झाला व त्यानंतर लगेचच दोन दिवसाने शुक्रवारी (ता.08)  सायंकाळी मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बळिराजा काहीसा सुखावला. शुक्रवारी (ता.08) सायंकाळी पाचच्या सुमारास भिगवण व परिसरामध्ये दमदार पावसास सुरवात झाली. सुमारे तासभर झालेल्या पावसांमुळे उसाच्या वाफ्यामध्ये व सखल भागामध्ये पाणी साठल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

भिगवण येथे पावसांचे पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून वहात होते. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूची गटारे तुंबल्यामुळे पाणी सेवा रस्त्यावरुनच वाहत होते. हा पाऊस ऊस व चारा पिकांना तसेच खरिपाच्या पेरणी पूर्व मशागतींना उपयुक्त असल्याचे डिकसळ (ता.इंदापूर) येथील शेतकरी विजयकुमार गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Heavy rain in Bhigwan