उच्चदाब वाहिनीखाली शाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्तीतील स्थिती; मनोऱ्यांची उंची वाढविल्याचा परिणाम
पिंपरी - रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने महापारेषण कंपनीने त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील उच्चदाब वाहिनीच्या मनोऱ्यांची उंची वाढवली. मात्र, त्याचा उलटा परिणाम दिसू लागला आहे. काही नागरिकांनी उच्चदाब वाहिनीखालीच इमल्यावर इमले बांधण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी तर शाळा थाटल्या आहेत. सध्या मोरेवस्ती परिसरात दोन उच्चदाब वाहिन्यांखाली तीन शाळा आणि चार बालवाड्यांच्या इमारती असून, हजारो विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.

चिंचवड ते चाकण आणि चिंचवड ते टेल्को या भागात वीजपुरवठा करण्यासाठी ‘महापारेषण’ने २२० किलो व्होल्टची उच्चदाब वाहिनी टाकली आहे. ही वीजवाहिनी म्हेत्रे वस्ती, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हाणे वस्ती, मोरे वस्ती आणि नेवाळे मळा या भागातून जाते. या भागात दाट लोकवस्ती आहे. उच्चदाब वाहिनीच्या तारांना झोळ पडल्याने त्यांची जमिनीपासूनची उंची कमी झाली होती. वीजवाहिन्यांची कमी झालेली उंची आणि रहिवाशांनी त्याखाली केलेले अतिक्रमण, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. गेल्या दोन वर्षांत चार जणांचा बळी गेला आहे. वाहिनी खालून जाताना उसाचा ट्रकही पेटला होता. असे अपघात टाळण्यासाठी वाहिन्यांचा झोळ कमी करून त्यांची उंची वाढविण्याबाबत माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत ‘महापारेषण’कडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महापारेषणने सहा मनोरे काढून नवीन दहा मीटर उंचीचे आठ मनोरे उभारले आणि त्यामुळे तारांची उंचीही वाढली. मात्र, मनोऱ्यांची उंची वाढविली तशी रहिवाशांनी उच्चदाब वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचा धडाकाच लावला आहे. पूर्वी वाहिनीच्या बाजूला एक मजली पत्र्याची घरे बांधली जायची. आता काँक्रीटची दोन ते तीन मजली पक्की घरे बांधली जात आहेत. 

नियमांची ऐशीतैशी
उच्चदाब वाहिनीच्या शेवटच्या तारेपासून तीन मीटर अंतर सोडूनच बांधकामे करावे, असा नियम बांधकाम करणाऱ्यांनी पाळलेला दिसत नाही. उच्चदाब वाहिनीखालीच आता शाळा व बालवाड्या बांधून त्या चालवल्या जात आहेत. एकूण तीन शाळा आणि चार बालवाड्या या वाहिन्यांखाली आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. हजारो विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: high tension wire on school