नीरा खोऱ्यातील धरणांत ५ वर्षांतील उच्चांकी पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सोमेश्वरनगर - नीरा खोऱ्यातील चार धरणांत आजअखेर सुमारे साडेसहा टीएमसी इतका पाणीसाठा आहे. यापैकी पाच टीएमसी उपयुक्त साठा आहे. तो गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. वीर धरणावरील नीरा डावा व उजव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन जूनअखेर चालणार आहे. याशिवाय पिण्यासाठी व पालखीसाठी पुरेसे पाणी राखून ठेवले जाणार आहे.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर व वीर या धरणांत मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. यामुळे तिन्ही धरणे शंभर टक्के भरली होती. सध्या नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्‍युसेक प्रतिसेकंद वेगाने, तर उजव्या कालव्यातून १५५० क्‍युसेक प्रतिसेकंद वेगाने शेती व औद्योगिक वापरासाठी एकूण चौथे आवर्तन सुरू आहे. उन्हाळी हंगामातही शेतीला पुरेसे पाणी मिळाले आहे. सध्या नीरा देवघर धरणात अर्धा टीएमसी, भाटघर धरणात जवळपास पावणेदोन टीएमसी, तर वीर धरणात ३.८८९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मागील पाच वर्षांतील जूनमध्ये शिल्लक असलेला हा सर्वाधिक पाणीसाठा आहे. जूनअखेर आवर्तन संपल्यावर उर्वरित पाणी पिण्यासाठी राखून ठेवले जाणार आहे. तसेच मागील वर्षी संत तुकाराम महाराजांचे पालखीचे सराटी (ता. इंदापूर) येथील, तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे नीरा (ता. पुरंदर) येथील नीरास्नान पाणीसाठ्याअभावी अडचणीत आले होते. यंदा मात्र पुरेसे पाणी असल्याने गतवर्षीप्रमाणे अडचण येणार नाही. 

कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार पाणी सोडण्याबाबत कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नाही. कारण पालखीसाठी, पिण्यासाठी पुरेसे पाणी राखून ठेवले जाणार आहे. शेतीसाठी जूनअखेर आवर्तन चालणार आहे. 
विजय नलावडे, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग  

Web Title: Highest water of 5 years in Neera valley dam