वारांगनांचा विधायक गणेशोत्सव!

वारांगनांचा विधायक गणेशोत्सव!

पुणे : बुधवार पेठेत देहविक्री करणारी एक महिला सुमन (नाव बदलेले आहे). सुमनसह तिच्या मैत्रिणींनी गणेशोत्सव साजरा करण्याची इच्छा या वर्षी पूर्ण केली. त्यांनी एवढ्यावरच न थांबता गणेशोत्सवासाठी गोळा केलेल्या वर्गणीतून अवास्तव खर्च टाळत एका गरजू मूकबधिर मुलीला श्रवणयंत्र भेट दिले. 

बुधवार पेठेतील जॉन पॉल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात या महिलांनी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. सुमन आणि तिच्यासारख्या अनेक मैत्रिणींनी वर्गणी जमा केली. या पैशातून त्यांनी गणपतीची लहानशी मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली. गणेशमूर्तीभोवती आकर्षक सजावट स्वत: या महिलांनी केली. गणपतीची पूजा, आरती, प्रसाद या सगळ्या जणी मिळून करतात. 

याबाबत बोलताना त्यांच्यातील माधवी (नाव बदललेले आहे) म्हणाली, ‘‘गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. आपल्या आनंदासाठी भरमसाट पैसे खर्च करण्यापेक्षा त्यातून काटकसर करून एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो. म्हणून आम्ही भाग्यश्रीला कानाचं मशिन घेऊन दिले.’’ या गणेशोत्सवात देहविक्री करणाऱ्या पुरुष, तृतीयपंथी, एचआयव्ही - एड्‌सग्रस्त महिला - पुरुषांनाही या महिलांनी आनंदाने सहभागी करून घेतले आहे. 

देहविक्री करणाऱ्या महिलांनी गणेशोत्सवाची इच्छा व्यक्त केल्यानंतर संस्थेने त्यांना पाठिंबा देऊन सहकार्य केले. या महिलांनी जमा केलेल्या वर्गणीतून २८ हजार रुपये खर्च करून भाग्यश्री नायडू या गरजू मूकबधिर मुलीला श्रवणयंत्र भेट दिले. 
- डॉ. जॉर्ज स्वामी पॉल, प्रमुख, जॉन पॉल संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com