पोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण 

अनंत काकडे 
रविवार, 27 मे 2018

चिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास कोणीही पुढे येत नाही. तेवढ्यात कुटुंबासह गावी जात असलेला एक पोलिस अधिकारी हा प्रकार पाहतो. त्यांच्यात वर्दीतला माणूस जागा होतो. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला आपल्या गाडीत घालून ते रुग्णालयात दाखल करतात. देवदूतासारखे धावून आलेल्या त्या अधिकाऱ्यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीला जीवदान मिळते.

राजेंद्र निकाळजे असे त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव. गजानन काशीद (वय 55) हे बुधवारी सकाळी आपल्या सायकलवरून कामावर निघाले होते. शाहूनगर (चिंचवड) येथून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मोटारीची त्यांना धडक बसली. धडक बसताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मोटारीला सफाई कामगार महिलांनी अडविले. सफाई कामगार जाऊ देत नसल्याने मोटारचालक मदत करण्याऐवजी मोटार घटनास्थळी सोडून पळून गेला. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. मात्र, मदत करण्यास कोणीच पुढे येत नव्हते. सुमारे वीस मिनिटे ते तेथेच पडून होते. 

काशीद यांचे दैव बलवत्तर. तेवढ्यात निगडी पोलिस ठाण्यावरून मुंबई येथील नायगाव पोलिस मुख्यालयात आणि शुक्रवारी (ता. 25) पुन्हा नव्याने तयार होणाऱ्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली झालेले पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आपल्या कुटुंबासह शाहूनगर येथून मुंबईला निघाले होते. हा प्रकार पाहताच त्यांनी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या काशीद यांना उचलून आपल्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांना विनंती करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर काशीद यांच्या मोबाईलवरून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. उपचार सुरू झाल्यानंतर तब्बल दोन तासांनी काशीद शुद्धीवर आले. एका पोलिस अधिकाऱ्याने दाखवलेल्या माणुसकीमुळे काशीद यांना जीवदान मिळाले. 
 
पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि माणुसकीमुळे माझे प्राण वाचले. 
- गजानन काशीद, अपघातग्रस्त 

Web Title: humanity of policeman saved life