माणुसकीच्या नात्याचा "अमृता'नुभव 

514_2422_1700_3014.jpg
514_2422_1700_3014.jpg

वडगाव शेरी : अमृताचे वय केवळ एक वर्ष... त्यात जडलेला दुर्धर आजार... तासातासाला खालवणारी प्रकृती... उपचार मिळावेत म्हणून मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांची सुरू असलेली धडपड; परंतु महागड्या उपचारांपुढे त्यांचा धीर खचलेला होता. अशातच वडगाव शेरीतील चार तरुण पुढे येतात... निरपेक्ष भावनेने उपचाराचा खर्च उचलतात आणि चिमुकलीवर उपचारांचा मार्ग सुकर होतो. असा माणुसकीचा "अमृता'नुभव ससून रुग्णालयात अनुभवास आला. 

ससूनमध्ये दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अमृता दत्ता चांदणे दाखल झाली आहे. तिच्या उपचारासाठी आवश्‍यक महागडी इंजेक्‍शन तिथे उपलब्ध नव्हती. पालकांची महागडी इंजेक्‍शन घेण्याची कुवत नसल्याने त्यांनी ससूनच्या समाजसेवा विभागामार्फत अभ्यागत समिती सदस्या बागेश्री मंथालकर यांच्याशी संपर्क साधला. बागेश्री यांनी वडगाव शेरीतील भाजपचे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्याशी संपर्क करून मदतीसाठी विचारणा केली. त्याला लागलीच प्रतिसाद देत गलांडे व त्यांच्या मित्रांनी स्वखर्चाने गुरुवारी (ता. 12) ही इंजेक्‍शन उपचार उपलब्ध करून दिली. एका इंजेक्‍शनची किंमत सुमारे पंधरा हजार होती. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर एका विक्रेत्याने ती प्रत्येकी सहा हजारांत देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गलांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोवीस हजारांची चार इंजेक्‍शने खरेदी करून ससून प्रशासनाकडे सुपूर्त केली. तसेच पाचव्या इंजेक्‍शनाची आर्थिक मदतही दिली. 

अमृताचे आईवडील देवळाली (ता. करमाळा, सोलापूर) येथील रहिवाशी. ते मोलमजुरी करतात; मात्र अमृताला दुर्धर आजार झाल्याने व त्यावरील इलाजाचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी गावावरून थेट ससून रुग्णालय गाठले. याकामी गलांडे यांच्यासोबत त्यांचे मित्र उद्योजक चंद्रकांत पगारिया, संजय पाखराणी, गणेश बेंद्रे यांनी आर्थिक मदत केली. या वेळी ससूनच्या समाजसेवा अधीक्षक विभागाचे प्रमुख एम. बी. शेळके, अभ्यागत समिती सदस्या बागेश्री मंथालकर, समाजसेवा अधीक्षक नंदबोधी पगारे, मोहनिश निकम उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com