पुण्याचा कचरा प्रश्न सुटला नाही तर राजीनामा: शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

तोंडाला काळीपट्टी बांधून आंदोलन करत असलेल्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आज सकाळी फुरसुंगी गावात पोहचल्यानंतर शिवतारे यांनी जर कचरा प्रश्न सोडला नाहीतर राजीनामा देईल अशी घोषणा केली.

पुणे - गेल्या 22 दिवसांपासून सुरु असलेला पुण्यातील फुरसुंगी येथील कचरा डेपोचा प्रश्न अद्यापही सुरुच असून, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी आज (शनिवार) फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फुरसुंगी येथील कचरा प्रश्न सुटला नाही तर राजीनामा देईन, असे वक्तव्य केले.

तोंडाला काळीपट्टी बांधून आंदोलन करत असलेल्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आज सकाळी फुरसुंगी गावात पोहचल्यानंतर शिवतारे यांनी जर कचरा प्रश्न सोडला नाहीतर राजीनामा देईल अशी घोषणा केली. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्याची दाट शक्यता होती. मात्र, ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेनंतरही यावर तोडगा निघू शकला नाही. ग्रामस्थांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. 

शिवतारे यांनी बराच वेळ ग्रामस्थांशी चर्चा केली. पण, ग्रामस्थांनी कोणत्याही चर्चेला विरोध दर्शविला.