काश्‍मीरींना 'व्हिलन' ठरवू नका! : काश्मिरी पत्रकार

स्वप्नील जोगी
शनिवार, 3 जून 2017

पुणे : ''प्रसारमाध्यमे जे दाखवतात, त्यापेक्षा काश्‍मीरमधील खरी परिस्थिती वेगळी आहे. आज काश्‍मीरमधील वास्तव खूप भयावह आहे. काश्‍मीरचे खोटे आणि चुकीचे चित्र तयार करत तेथील लोकांना हेतुपुरस्सर 'व्हिलन' ठरवले जात आहे. वास्तवात, तेथील जनतेचा देशाच्या लोकशाहीमध्ये नेहमीच विश्वास टिकून राहिला आहे.

पुणे : ''प्रसारमाध्यमे जे दाखवतात, त्यापेक्षा काश्‍मीरमधील खरी परिस्थिती वेगळी आहे. आज काश्‍मीरमधील वास्तव खूप भयावह आहे. काश्‍मीरचे खोटे आणि चुकीचे चित्र तयार करत तेथील लोकांना हेतुपुरस्सर 'व्हिलन' ठरवले जात आहे. वास्तवात, तेथील जनतेचा देशाच्या लोकशाहीमध्ये नेहमीच विश्वास टिकून राहिला आहे. काश्मिरी तरुणांना भारत आपला देश वाटला नसता, तर ते पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये येऊन का शिकले असते?'' अशा शब्दांत काश्‍मीरमध्ये अनेक वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी तेथील वास्तवाला हात घातला.

'पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी' संस्थेच्या वतीने शनिवारी आयोजिण्यात आलेल्या चर्चासत्रात काश्‍मीरबाबत अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. 'काश्मिरींचा दृष्टिकोन : मिथक आणि वास्तव' या विषयावर हे चर्चासत्र झाले. सहभागी वक्‍त्यांत जम्मू येथील 'काश्‍मीर टाईम्स' दैनिकाच्या संपादक अनुराधा भसीन (जमवाल), श्रीनगरच्या 'काश्‍मीर इमेजेस' दैनिकाचे संपादक बशीर मंझर, पत्रकार जतीन देसाई तसेच फोरमचे अध्यक्ष मिलिंद चंपानेरकर यांनी मतं मांडली.

मंझर म्हणाले, ''काश्‍मीर मध्ये पूर्वीही लष्करी कारवाया आणि अतिरेकी अस्तित्वाबाबत संताप होता, विरोध होता पण तिरस्कार आणि खदखद कधीही नव्हती. आता मात्र तसे होऊ लागले आहे. जर खुद्द लष्करप्रमुख मानवी ढाल (ह्युमन शिल्ड) कशी योग्य होती आणि दगड नको बंदुका आणा, अशी बेजबाबदार वाक्‍य काश्मिरी तरुणांना उद्देशून वापरत असतील, तर आपण नक्की कुठल्या दिशेने जात आहोत, याचा विचारच केलेला बरा...''

भसीन म्हणाल्या, ''टियर गॅस शेल, पॅलेट गन यामुळे अनेक काश्मिरी तरुण मारले गेले आहेत. पाच-सहा वर्षांच्या मुलांचे डोळे फुटले आहेत. मला आश्‍चर्य वाटते की, हे सारे सरकार आणि लष्कराच्या मर्जीने घडत आहे. भारतात हिंसक निषेध फक्त काश्‍मीरमध्येच होत आले आहेत काय? प्रत्येक दगडफेकीच्या ठिकाणी अशीच कारवाई करून लोकांना मारून टाकले जाते का? हिंसक नागरिक आणि दहशतवादी यांत लष्कराला फरक कळत नाही, असेच दुर्दैवाने म्हणायला हवे.'' 

मनमोहन, वाजपेयी होते संवादी 
मंझर म्हणाले, ''काश्‍मीरमधील आजची परिस्थिती बुऱ्हान वाणीच्या एन्काऊंटरनंतर झालीय, असे नाही. 2010 मध्येही असेच घडले होते. अनेक तरुणींना त्यावेळी लष्कराने मारले होते. मात्र, त्यावेळी मनमोहन सिंग यांनी तातडीने जनतेशी संवाद साधला होता, हे महत्त्वाचे! वाजपेयींचा दृष्टीकोनही असाच संवादी होता. आज मात्र तसे काहीही आज दुरान्वयानेही दिसत नाही.'' 
 

पाडगावकरांच्या सूचना अंगिकारा 
काश्‍मीर प्रश्‍नावर उपाय शोधण्यासाठी मनमोहन सिंगांनी दिलीप पाडगावकर आणि अजून दोघांच्या टीमची स्थापना करून एक महत्त्वाचे पाऊल उचलले होते. पण, या टीमच्या अहवालाला गांभीर्याने घेतले गेले नाही. तसे घडले असते, तर आजची विदारक परिस्थिती कदाचित उद्भवली नसती ! 

आतातरी त्या अहवालामधील सूचना सरकारने अंगिकाराव्यात. भारत-पाकिस्तान, भारत सरकार-हुरियत कॉन्फरन्स आणि काश्‍मीरी लोक, पाकिस्तान-काश्‍मीरी लोक आणि काश्‍मीरी लोकांत परस्पर संवाद अशा चारही पातळीवर संवाद सुरू व्हायला हवा, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त झाली.