देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदीमुळे संकटात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

शरद पवार यांचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत मत 

शरद पवार यांचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत मत 

पुणे : नोटाबंदीनंतर ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. 
या वेळी खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेश फुलफगर, "जितो'चे अध्यक्ष विजय भंडारी, महेश सहकारी बॅंकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत, दिलबागसिंग, लक्ष्मीकांत खाबिया, अशोक राठी आदी उपस्थित होते. 
बैठकीत पवार यांनी केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भात घेतलेल्या निर्णयांवर टीका केली. ते म्हणाले, ""केंद्र सरकारने टोकाच्या भूमिका घेतल्याने उद्योजक, व्यापारी आणि नागरिक अशा सर्वच घटकांना परिणाम भोगावे लागत आहेत. उद्योग क्षेत्रात कामगार कपात होत असल्याने रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा संपुष्टात आला असता, तर हा निर्णय योग्य ठरला असता; पण नोटाबंदीनंतर देशातील 80 टक्के चलन व्यवहारातून बाहेर पडले आणि त्याला पर्यायी व्यवस्था न केल्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत. सर्वच क्षेत्रांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. धनिकांचा सगळा काळा पैसा स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये आहे. या बॅंका गुप्ततेचे धोरण सोडत नाहीत. आता बाहेरचा काळा पैसा आणता येत नाही म्हणून मग काही तरी केले असे दाखवण्यासाठी ही नोटाबंदी केली गेली.'' 
राजकारणापेक्षा मला देशाच्या अर्थकारणात, शेती आणि उद्योगात अधिक रस असल्याचे नमूद करत व्यापारीवर्गाशी कायम संपर्क राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील तीन मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला. सुशिक्षित लोकांनी भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. या निकालाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहतो, असेही त्यांनी सांगितले. 
""व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा,'' अशी मागणी रांका यांनी पवार यांच्याकडे केली.  

इतिहासाचे चित्रण वास्तव हवे : पवार 
पुणे : "तुम्ही संघटना उभी करा; पण वाचन संस्कृती मजबूत करण्याची खबरदारी घ्या. आपण काय वाचले पाहिजे आणि इतरांना काय वाचायला देत आहोत, याचे तारतम्य बाळगा. कारण, इतिहासाचे वास्तव चित्रण हीच खरी ओळख पुढच्या पिढीपुढे यायला हवी,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही या प्रसंगी करण्यात आला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा ऍड. वंदना चव्हाण, समितीचे संस्थापक विकास पासलकर उपस्थित होते. डॉ. अ. ल. साळुंखे, पी. ए. इनामदार, प्रमोद मांडे, ऍड. मिलिंद पवार, प्रा. वृषाली रणधीर, रमेश राक्षे, विठ्ठल गायकवाड यांना पवार यांच्या हस्ते "शिवसन्मान गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. 
पवार म्हणाले, ""विकृत स्वरूपात इतिहास लिहिणाऱ्यांचा पर्दाफाश केला, तर नव्या पिढीपुढे वास्तव येईल. इतिहासाचा आधार घेऊन समाजात वैमनस्य करण्याचा अनेक वर्षे प्रयत्न झाला. कारण शब्दांचाही उल्लेख निश्‍चितपणाने व्हायला हवा. राक्षसाचा, वाईट प्रवृत्तीचा वध होतो; पण गांधीवध असा शब्दप्रयोग करणे म्हणजे त्यामागे आकसाची भावना मांडली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या धर्माविरुद्ध नव्हते. आपणही जातीच्या, धर्माच्या विरुद्ध यत्किंचितही नाही. त्यामुळेच विकृत विचारांचा संघर्ष करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे.'' 
खेडेकर म्हणाले, ""शरद पवार गेली पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. ते पंतप्रधान व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीला पाठिंबा देईल.'' 

 

पुणे

नवी सांगवी - पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडल व सांगवी परिसर महेश मंडल आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरीता ‘तीज सत्तु...

05.09 PM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM