इंद्रप्रस्थ उद्यानाचे प्रवेशद्वार 42 लाखांचे! 

इंद्रप्रस्थ उद्यानाचे प्रवेशद्वार 42 लाखांचे! 

येरवडा : जयजवाननगर येथील इंद्रप्रस्थ उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानात मुलांसाठी खेळणी नाही. मात्र, उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी तब्बल 42 लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यामुळे हा खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठ, अशी चर्चा रंगली आहे. जयजवाननगर येथे नव्वदच्या दशकात तत्कालीन उपमहापौर नंदू मोझे यांच्या प्रयत्नातून इंद्रप्रस्थ उद्यानाची निर्मिती झाली होती.

त्या वेळी उद्यानात आधुनिक खेळणी व फुलराणी बसविण्यात आली होती. मात्र, फुलराणी व उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली. येथील लोखंडी खेळणी चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतरच्या अनेक नगरसेवकांनी उद्यानाच्या विकासासाठी एक रुपयाही खर्च केला नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

या निधीतून उद्यानातील विविध विकासकामे होणे अपेक्षित होते. मात्र, उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी तब्बल 42 लाख रुपयांचा चुराडा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यावर नागरिक प्रश्‍न उपस्थित करू लागले आहेत. 

इंद्रप्रस्थ उद्यान नव्याने विकसित करण्यात येत आहे. 'ट्रॅफिक पार्क'ची संकल्पना असलेल्या या उद्यानात वाहतूकविषयक नियमांचे फलक, वाहतूक नियंत्रक दिवे व चिन्हे असतील, अशी माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली. 

उद्यान संरक्षित करण्यासाठी समोरची सीमाभिंत व मुख्य प्रवेशद्वाराचे दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी 42 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्यानातील विकासकामे पुढच्या अर्थसंकल्पाच्या निधीतून करण्यात येणार आहेत. 
- अमोल रुद्रके, कनिष्ठ अभियंता, उद्यान विभाग, पुणे महानगरपालिका 

इंद्रप्रस्थ उद्यानाभोवती संरक्षक भिंत, उद्यानातील फुलझाडे, लॅंडस्केप, मुलांसाठी खेळणी अपेक्षित असताना केवळ मुख्य प्रवेशद्वारासाठी इतका खर्च करणे म्हणजे उधळपट्टी आहे. 
- सीमा पवार, रहिवासी, जयजवाननगर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com