आंबेडकरांचे नाव घेऊन ब्राह्मणवाद संपवावा- पांडे

पांडुरंग सरोदे
शनिवार, 21 जानेवारी 2017

मोदी सरकारने द्वेष, मतभेद, विभाजन, अंधभक्ती, निराशावाद व नोटबंदी यासारख्या मुददयांनाच प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला फोडण्याचेच काम केले आहे. अन्याय, चुकीच्या गोष्टींना विरोध करणाऱ्या कलाकारांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांना संपविले जात आहे.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन आरक्षण बंद करा, असे सांगणारयांनी आगोदर आंबेडकरांचे नाव घेऊन मनुवाद, ब्राह्मणवाद संपवावा, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडे याने व्यक्त केले. 

अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनात बोलताना मोहित पांडे याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. जातीय आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे मत संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. त्यानंतर आरक्षणाच्या बाबतीत मोहित पांडे याने आपले मत मांडले आहे. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरही उपस्थित होत्या.

पांडे म्हणाला, की मोदी सरकारने द्वेष, मतभेद, विभाजन, अंधभक्ती, निराशावाद व नोटबंदी यासारख्या मुददयांनाच प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला फोडण्याचेच काम केले आहे. अन्याय, चुकीच्या गोष्टींना विरोध करणाऱ्या कलाकारांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांना संपविले जात आहे. सक्ती व सत्तेच्या जोरावर विवेकवाद्यांचा आवाज दडपला जात आहे, त्यांना संपविले जात आहे. धर्म व जातीयवादाला खतपाणी घालण्याचे काम संघ करत आहे. रोहित वेमुलाची हत्या संस्थात्मक हत्या आहे. ही हत्या घडविणारे कुलगुरू आप्पाराव सारख्यांना पुरस्काराने गौरविले जात आहे. 'जेएनयू'च्या नदीम अहमद या विद्यार्थ्यास 'अभाविप'ने मारहाण करून गायब केले आहे. 

मेधा पाटकर म्हणाल्या, ''सध्या संविधानातील मूल्यांकडे फक्त दुर्लक्षच होत नाही, तर ते संपविण्याचाच प्रयत्न होत आहे. देशात प्रत्येक मिनिटाला 2-3 बलात्कार होत आहेत. त्यामुळे केवळ दिल्लीतील निर्भयाचाच नाही, तर प्रत्येक महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरुद्ध उठविला पाहिजे. 2014 नंतर घेण्यात आलेले निर्णय संविधानाच्या विरोधी आहेत. जातीयवाद व मूलतत्ववाद अजुनही वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर प्रदेशात निवडणुकीत जातीचा आधार घेतला जात आहे. संघ देशापुढे छोटा आहे, मात्र त्यांच्या संघटना, मोर्चा व मंचला कसे आव्हान देऊ याचा विचार युवकांनी केली पाहिजे. समाजवादी सत्याग्रहीसाठी, जनसत्तेसाठी संवाद व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न युवकांनी करावा. देशात मराठा, जाट, ब्राह्मण व अन्य समाजही आरक्षणाची मागणी करु लागले आहेत. कोपर्डीच्या घटनेनंतर विविध आंदोलनातून रस्त्यावर उतरल्या. ही नक्कीच चांगली बाब आहे. मात्र या घटनेच्या पार्श्वभुमीवर अॅट्रॉसिटी व आरक्षणाच्या विरोधातील भूमिका चुकीची आहे. अशा घटनांविरुद्ध युवकांनी एकत्रित लढले पाहिजे.