खडकवासल्याचे पाणी ठरते आहे इंदापुरकरांसाठी मृगजळ

chari
chari

भिगवण (पुणे) : खडकवासला प्रकल्पाच्या मुठा उजव्या कालव्याच्या माध्यमातून इंदापुर तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी आदी गावांतील सात हजार एकर क्षेत्र लाभक्षेत्र म्हणुन दाखविले आहे. उपचाऱ्यांकरिता या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत तर प्रती दहा एकरामागे दोन एकर क्षेत्रावर राखीव असा शेरा मारलेला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन व जमिनीवर राखीव शेरे मारुनही मागील वीस वर्षामध्ये या भागातील शेतकऱ्यांना खडकवासला प्रकल्पाच्या पाण्याचा थेंबही मिळाला नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. त्यामुळे एक पिढी संपली तरिही पाण्याची प्रतिक्षा मात्र संपत नसल्यामुळे खडकवासल्याचे पाणी शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत असल्याचे चित्र आहे.

इंदापुर तालुक्यासाठी खडकवासला धरणाचे पाणी हा विषय नेहमीच राजकिय व सामाजिक दृष्ट्या संवेदनशील राहिला आहे. तालुक्यातील मदनवाडी, भादलवाडी, पोंधवडी आदी गावातील सुमारे सात हजार एकर क्षेत्र खडकवासला प्रकल्पाच्या मुठा उजव्या कालव्याच्या माध्यमातून ओलिताखाली आणण्याचे नियोजन होते. कालव्याच्या 36 व 48 क्रमांकाच्या चारीच्या माध्यमातून या भागातील क्षेत्रास पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मागील वीस वर्षामध्ये शासनाच्या माध्यमातून याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कालव्यातील पाण्याचे भिजत घोंगडे पडलेले आहे. वीस वर्षापुर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीसाठीचा खर्च हा आठ कोटी छत्तीस लाख रुपये अंदाजित केला होता. त्यामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अंदाजपत्रकानुसार कालव्याच्या पोटचाऱ्यांच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीसाठी शासनाकडुन निधी येण्याची अपेक्षा होती. परंतु मागील वीस वर्षामध्ये निधी मिळाला नाही. 

याबाबत इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे याचिका दाखल केली होती. लवादाने लाभक्षेत्रातुन वसुल होणाऱ्या पाणीपट्टीच्या माध्यमातून पोटचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी व शेतकऱ्यांना पाणी द्यावे असा निर्णय दिला. एकुण लाभक्षेत्रापैकी केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळत असल्यामुळे पाणी न मिळालेल्या शेतकऱ्यांकडुन पाणीपट्टी कशी वसुन करणार असा प्रश्न आहे. लवादाक़डुनही शेतकऱ्यांची निराशा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाणी मिळण्याचा आशा आणखीच धुसर झाल्या आहेत. त्यामुळे इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खडकवासला प्रकल्पाच्या मुठा उजव्या कालव्याचे पाणी मृगजळच ठरले आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर म्हणाले, इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर खलकवासला प्रकल्पाच्या पाण्याबाबत मोठा अन्याय झाला आहे. तालुक्यातील सात हजार एकर क्षेत्रापैकी कालव्याजवळीस केवळ दहा टक्केच क्षेत्रास लाभ मिळत आहे. त्यामुळे याबाबत खडकवासला कालव्याच्या पोटचाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करुन द्यावी व समन्यायी पध्दतीने इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. खडकवासला प्रकल्पाच्या पाण्याची इंदापुत तालुक्यातील शेतकरी मागील वीस वर्षापासुन वाट पाहतो आहे त्याची प्रतिक्षा आत्ता तरी संपावी अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com