ऑगस्ट उजाडला तरी गणवेश मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

गणवेशासाठी मिळणारे अनुदान हे अपुरे पडत असल्यास तसे वरिष्ठ पातळीवर कळविण्यात येईल. विद्यार्थ्यांची शून्य रकमेसह आणि सहजरीत्या खाती उघडावीत, यासाठी बॅंकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तरीही बॅंकेत खाती उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यास बॅंकांना पुन्हा सूचना करण्यात येतील.
- शैलजा दराडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)  

क्‍लिष्ट पद्धतीमुळे अनेकांनी बॅंक खाते उघडले नाही; अनुदानही तुटपुंजेच
खेड-शिवापूर - गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या नावावर जमा करण्याच्या योजनेचा फज्जा उडाला आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. क्‍लिष्ट पद्धतीमुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांची खाती बॅंकेत उघडलीच नाहीत. त्यातही मिळणारे चारशे रुपये अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने उर्वरित रकमेचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागणार आहे.

जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. मात्र, या वर्षीपासून त्यात बदल करण्यात आला आहे. गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या नावे बॅंकेत अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार प्रथम पालकांनी दोन गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांकडे जमा करायची आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. अनेक पालकांची ऐपत नसल्याने त्यांनी अद्याप गणवेश खरेदी केलेले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित आहेत. तसेच दोन गणवेशासाठी चारशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, लहान विद्यार्थ्यांचे अपवाद वगळता मोठ्या विद्यार्थ्यांचे गणवेश चारशे रुपयांत खरेदी करता येत नसल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चारशे रुपयांपेक्षा जास्त लागणारे पैसे पालकांना स्वतःच्या खिशातून द्यावे लागणार आहेत. हे अनुदान जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाती उघडण्यास सांगण्यात आले आहे.

मात्र, ही खाती उघडण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अजूनही अनेक विद्यार्थ्यांची खाती उघडलेली नाहीत. अशा विद्यार्थ्यांना गणवेशाच्या अनुदानावर पाणी सोडावे लागणार असून त्यांच्या पालकांना स्वखर्चाने गणवेश खरेदी करावे लागणार आहे. 

त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी विद्यार्थ्यांच्या खात्यांसाठी अडवणूक न करता सहज आणि लवकर खाती उघडण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत.

शून्य रकमेचे खाते उघडण्यास नकार
विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याबाबत माहिती घेण्यासाठी वेळू (ता. भोर) येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांची शून्य रकमेची खाती उघडता येत नाही. विद्यार्थी हा भोर तालुक्‍यातच राहणारा असावा. शिवाय विद्यार्थ्याच्या पालकांचे खाते या बॅंकेत असायला हवे, अशी नियमावली बॅंकेतून सांगण्यात आली.

Web Title: khed shivapur pune news zp school uniform