कचरा डेपोची जागा मेट्रोसाठी द्यावी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोच्या डेपोचे काम सुरू करता यावे, यासाठी ती जागा तातडीने ताब्यात मिळावी, अशी मागणी "महामेट्रो'ने महापालिकेकडे एका पत्राद्वारे नुकतीच केली आहे. वनाज- रामवाडी मेट्रो मार्गासाठी ही जागा आवश्‍यक असून, ती ताब्यात मिळाल्यावर मेट्रोचा डेपो साकारता यावा, यासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. 

पुणे - कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोच्या डेपोचे काम सुरू करता यावे, यासाठी ती जागा तातडीने ताब्यात मिळावी, अशी मागणी "महामेट्रो'ने महापालिकेकडे एका पत्राद्वारे नुकतीच केली आहे. वनाज- रामवाडी मेट्रो मार्गासाठी ही जागा आवश्‍यक असून, ती ताब्यात मिळाल्यावर मेट्रोचा डेपो साकारता यावा, यासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. 

वनाज - रामवाडी हा 14.65 किलोमीटर मेट्रोचा मार्ग आहे. त्यावर रस्त्यावरून जाणारी म्हणजे एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो धावणार आहे. या मार्गावर वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, महापालिका, शिवाजीनगर न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल क्‍लिनिक, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी येथे मेट्रोची 16 स्थानके असतील. रस्त्यापासून 12 ते 22 मीटर उंचीवर खांब उभारून एलिव्हेटेड मार्ग निर्माण केला जाणार आहे. 

कोथरूडमध्ये कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोसाठी डेपो उभारण्यात येणार आहे. वनाज- रामवाडी मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या देखभाल- दुरुस्तीची कामे डेपोमध्ये होणार आहेत. सुमारे सात डब्यांच्या मेट्रोला पहिल्या वर्षी सुमारे साडेतीन लाख प्रवासी मिळतील, असे अपेक्षित आहे. नियोजित डेपो तीन मजली असेल. तसेच, रात्रीच्या वेळी मेट्रो तेथे थांबणार आहे. मार्गाच्या उभारणी दरम्यान नियोजित डेपोच्या जागेवर यंत्रसामग्री ठेवून तेथून मेट्रोचे काम सुरू होणार आहे. या मार्गासाठी मेट्रोचा दुसरा डेपो शिवाजीनगर कृषी महाविद्यालयाकडून मिळणाऱ्या जागेवर होणार आहे, त्यासाठीची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे. 

कोथरूड कचरा डेपोची आणि कृषी महाविद्यालयाची जागा तातडीने मिळाल्यास दोन्ही डेपो उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. त्यासाठीच्या निविदा दोन-तीन महिन्यांतही काढल्या जाऊ शकतात, असेही महामेट्रोच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याची मागणी परिसरातील नगरसेवकांकडून होत आहे, त्याबाबत राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. 

मेट्रोसाठी पुरेशी तरतूद मिळणार 
केंद्र सरकारने शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी 950 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. तर, राज्य सरकारने 130 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. मेट्रोच्या निविदांना मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. सध्या महामेट्रोकडे 1080 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. काम सुरू झाल्यावर महामेट्रोला आणखी निधीची आवश्‍यकता भासल्यास विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पुरवणी मागण्यांद्वारे तरतूद उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले. 

एप्रिलअखेरीस प्रत्यक्ष कामाला प्रारंभ 
मेट्रो मार्गासाठी दोन्ही शहरांतील भूगर्भीय चाचण्यांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. पिंपरी - स्वारगेट मार्गावरील दहा किलोमीटरच्या मार्गासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठीची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. त्यानंतर निविदा मंजूर करून एप्रिल महिन्याच्या अखेरीस रस्त्यावर एलिव्हेटेड मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. त्यानंतर वनाज- रामवाडी, दोन्ही गोदामे, रेंजहिल्स ते स्वारगेट या मार्गांसाठी निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती दीक्षित यांनी दिली. 

Web Title: kothrud garbage depo issue