पाण्यामुळे भुयारी मार्ग बंद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

कोथरूड - कर्वेनगर चौकातील भुयारी मार्गात आठ दिवसांपासून एक फुटापेक्षा जास्त पाणी साचल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या चौकातील उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने पादचारी मोठ्या प्रमाणात भुयारी मार्गाचा वापर करत असल्याने लवकरात-लवकर हे पाणी काढून मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

भुयारी मार्गाचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, देखभालीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सतत अडचणी निर्माण होत आहेत. कर्वेनगर चौक वर्दळीचा असल्याने भुयारी मार्ग सुरू होणे आवश्‍यक आहे. या परिसरात महाविद्यालय, शाळा असल्याने सतत विद्यार्थी व नागरिकांची ये-जा सुरू असते. भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले, ‘‘भुयारी मार्गातील चेंबरचे पाइप तुंबल्याने पाणी साचले आहे. या मार्गातील पाणी काढण्यासाठी तक्रार देऊनही दखल घेण्यात आली नाही. याबाबत पालिकेचे अधिकारी चालढकल करत असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते.’’

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गणेश सोनुणे म्हणाले, ‘‘भुयारी मार्गातील पाणी दोन दिवसांत काढून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.’’

भुयारी मार्गातील समस्या
सुरक्षारक्षक नसणे

वीज दिवे गायब, वीज मीटरची झाकणे उघडी

साफसफाई नसल्याने अस्वच्छता

पाणी जाण्यासाठी असलेल्या चेंबरचे पाइप तुंबले आहेत.

कर्वेनगर चौक मोठा असल्याने भुयारी मार्ग सुरू ठेवणे गरजेचे आहे. या मार्गात पाणी साचल्याने आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. पावसाळ्यात अशा पाण्यामुळे स्वाइन फ्लू, डेंगीसारखे आजार होण्याची शक्‍यता असते.
- डॉ. सुनीता काळे, अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्‍टर सेल