अमली पदार्थ बनविणारी कुरकुंभची कंपनी सील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील सुजलाम केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे भागीदार हरिचंद्र दोरगे यांच्या गाडीतून बुधवारी मुंबईत एक कोटी 60 लाख रुपये किमतीचे आठ किलो, कंपनीमधील एक किलो पाचशे ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) व इतर रसायनांचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथक तसेच मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी कंपनीला सील ठोकले.

अमली पदार्थ विरोधी विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने सापळा रचून बुधवारी हरिचंद्र नानासाहेब दोरगे (रा. यवत, ता. दौंड) याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीतून आठ किलो वजनाचा व एक कोटी 60 लाख रुपये किमतीचा "मेफेड्रॉन' हा अमली पदार्थ जप्त केला.

या पदार्थाचे कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील सुजलाम केमिकल्स कंपनीत रसायन बनविण्याच्या नावाखाली उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून लांडे यांच्या सूचनेवरून या विभागाचे पोलिस निरीक्षक वाढवणे व मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक भालेकर यांनी बुधवारी दुपारी कुरकुंभ येथील सुजलाम कंपनीवर छापा घातला. त्यात एक किलो पाचशे ग्रॅम वजनाचा "मेफेड्रॉन' हा अमली पदार्थ व काही संशयित रसायनांचा साठा मिळाला. पथकाकडून ही कारवाई बुधवारी दुपारपासून गुरुवारी दुपारपर्यंत चालू होती. छाप्यात कंपनीत व कंपनीचे भागीदार हरिचंद्र दोरगे यांच्या गाडीत अमली पदार्थाचा साठा मिळाल्याने अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कंपनी सील केल्याचे कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या नोटिशीत म्हटले आहे.