राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य बाजारात दाखल

राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य बाजारात दाखल

पुणे - वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे व चिन्हे असलेल्या टोप्या; तसेच कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, इंजिन आणि पंजा या चिन्हांनी उपकरणे सजली आहेत. प्लॅस्टिकचे बिल्ले, तोरण, कटआउट इत्यादी प्रचाराच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. पक्षांच्या चिन्हांचे एलईडी ‘ब्रेसलेट’ हे या निवडणुकीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणता येईल. प्लॅस्टिकबरोबर कागदी आणि पर्यावरणपूरक प्रचार साहित्याची उपलब्धताही बाजारात दिसते आहे.

महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसल्या, तरी प्रचाराच्या वातावरण निर्मितीसाठी सध्या विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. कोपरा सभा, आंदोलने व राजकीय कार्यक्रमांसाठी प्रचार साहित्याची गरज राजकीय पक्षांना भासते. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्षांचे नाव, नेत्यांची छबी असलेले प्रचार साहित्य दाखल झाले आहे. त्यात झेंडे, धातूचे बिल्ले, प्लॅस्टिक बिल्ले, टोपी, मफलर, स्टीकर, पोस्टर, तोरण, रिबन, फॅन्सी बिल्ले, की-चेन, डिजिटल होर्डिंग, कटआउट्‌स इत्यादींचा समावेश आहे. टेरिकॉट आणि सॅटीनच्या कपड्यापासून पक्षांचे झेंडे तयार केले जातात. त्यात दहा बाय पंधरा इंचांपासून ते चाळीस बाय साठ इंचापर्यंतच्या झेंड्यांचा समावेश आहे.

मागणीनुसारही झेंडे आणि साहित्य तयार करून दिले जाते. महापालिका निवडणुकीत पक्षाबरोबरच उमेदवाराचे नाव महत्त्वाचे असते. त्यामुळे इच्छुक किंवा उमेदवारांच्या नावाच्या टोप्या, टी शर्ट, बनियनवर संबंधित पक्षाचे नाव किंवा चिन्ह इत्यादींचा समावेश करून दिला जातो. त्यासाठी सध्या टी शर्ट, झेंडे आदींना मागणी आहे.  

निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मागणीनुसार प्रचार साहित्य उपलब्ध करून दिले जाते. प्रचाराच्या साहित्याची तयारी तीन महिन्यांपासून सुरू केली असून त्यासाठी सुरत, दिल्ली व मुंबई आदी ठिकाणांवरून माल मागविला जातो. या वर्षी प्रचाराच्या साहित्यात राजकीय पक्षाचे चिन्ह असलेले एलईडी ‘ब्रेसलेट’ हे खास आकर्षण असणार आहे.
- निशिकांत राठी, प्रचार साहित्य विक्रेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com