कोंढव्यामध्ये बिबट्याची धाव

कोंढवा - एनआयबीएमच्या आवारात शिरलेला बिबट्या.
कोंढवा - एनआयबीएमच्या आवारात शिरलेला बिबट्या.

पुणे - एरवी विद्यार्थ्यांच्या वर्दळीने गजबजणाऱ्या कोंढव्यातील एनआयबीएममध्ये शनिवारी सकाळी बिबट्या दाखल झाला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती; परंतु मुळातच माणसांना घाबरून हा बिबट्या आवारातील एका खोलीत जाऊन टेबलाखाली दडी मारून बसला. चारही बाजूने बंद असणाऱ्या खोलीतील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जाळ्यात अडकवणे शक्‍य झाले. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वनक्षेत्रातून हा बिबट्या शहरात दाखल झाला असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

एनआयबीएमच्या मुख्य इमारतीमधील तळ मजल्यावर कामासाठी एक महिला गेली असता, तिला गुरगुरण्याचा आवाज आला. कुत्र्याच्या गुरगुरण्यापेक्षा हा आवाज नक्कीच वेगळा असल्याचे तिला जाणवले आणि तिने तेथून पळ काढला. कोणीतरी आपल्या खूप जवळ असल्याचे जाणवल्याने बिबट्याने दुसऱ्या खोलीच्या दिशेने (संगणक कक्ष) धूम ठोकली. दोन खोल्या जोडून होत्या, त्यातील एका खोलीत तो शिरला. ती खोली चारीही बाजूंनी बंदिस्त होती. घटनास्थळी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि वन विभागाशी संपर्क साधला. सकाळी सव्वानऊच्या सुमारास वन विभागाला हा ‘कॉल’ आला. तातडीने वन विभाग, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव अनाथालय यांच्या रेस्क्‍यू टीमचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले, हे सर्व अधिकारी दहाच्या सुमारास घटनास्थळी पोचले. मात्र, बिबट्या घाबरून खोलीत दडून बसल्याने टीममधील अधिकाऱ्यांना त्याला पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

चारही बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या या खोलीच्या बाहेरील बाजूने सुरवातीला काही मिनिटे बिबट्या दिसलाच नाही. कालांतराने टेबलाखाली दडी मारून बसल्याचे निदर्शनास आले. परंतु, त्यांना बिबट्याला पकडणे शक्‍य होईना. शेवटी मोक्‍याचा क्षण मिळाला आणि दुरून भूल देण्याच्या उपकरणाने बिबट्याला बेशुद्ध केले; तसेच त्याला जाळीत टाकून पिंजऱ्यात ठेवले.

याबद्दल उपवनसंरक्षक सत्यजित गुजर म्हणाले, ‘‘कोंढव्यात आढळलेल्या हा बिबट्या (नर) अंदाजे साडेतीन वर्षांचा आणि ७० किलो वजनाचा आहे. युवा बिबट्या असल्यामुळे तो खूप आक्रमक होता; परंतु आजूबाजूला माणसांना पाहून तो स्वत:च खूप घाबरला होता. सुरवातीला बराच वेळ तो टेबलाखाली दडी मारून बसल्यामुळे दिसत नव्हता. सुदैवाने त्याला पकडण्याच्या मोहिमेत बिबट्यासह इतर कोणीही जखमी झाले नाही.’’ 

या मोहिमेत उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, सहायक वनसंरक्षक मोहन ढेरे, व्ही. जे. गायकवाड, वन्यजीव अनाथालयाचे संचालक नीलिमकुमार खैरे, अनिल खैरे, डॉ. अंकुश दुबे, वनसंरक्षक विशाल यादव, एस. एस. बुचडे आदींनी भाग घेतला. वन विभाग, कात्रज येथील वन्यजीव अनाथालय, पोलिस विभाग आणि संस्थेचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल तीन तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. या बिबट्याला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पाच-सहा वर्षांनंतर दर्शन
पिंपरी चिंचवडमध्ये २००८ च्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर कोथरूड परिसरातही साधारणत: सात वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या बिबट्या आढळला होता. शहरात बिबट्या आढळून येण्याची ही गेल्या पाच-सहा वर्षांतील तिसरी घटना आहे. 

मात्र, शहराच्या बाहेर वाघोली, दौंड, शिरूर, राजगुरुनगर, जुन्नर, इंदापूर परिसरात बिबट्याचा वावर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. 

बिबट्या आला कुठून?
‘‘कोंढवा एनआयबीएमला लागून वनक्षेत्र आहे. पुणे-सोलापूर रस्ता, दौंड या पट्ट्यात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे हा बिबट्यादेखील पुणे-सोलापूर रस्ता, लोणी देवकर, महंमदवाडी, सासवड, वाघोली- कानिफनाथ डोंगराकडूनही या भागातून आला असण्याची शक्‍यता आहे. कुत्र्यांचा पाठलाग करता-करता हा एनआयबीएमच्या आवारात दाखल झाला असेल आणि माणसांची चाहूल लागल्याने तो घाबरून इमारतीच्या तळ मजल्यात घुसला असेल,’’ असा अंदाज सत्यजित गुजर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com