नियोजित विमानतळासाठी विशेष अधिकारी नेमणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुरंदर येथे लवकरच कार्यालय 
दोन अधिकारी तांत्रिक दर्जाचे असणार आहेत. पुरंदरप्रमाणेच शिर्डी आणि नागपूर येथील विमानतळासाठीही स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत या अधिकाऱ्यांची नियुक्त होणे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर पुरंदर येथे लवकरच कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे विमानतळ उभारण्याच्या कामास गती येणार आहे. दरम्यान, एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून करण्यात आलेल्या ओएलएक्‍स सर्व्हेक्षणाचा तांत्रिक अहवाल येत्या आठवड्याभरात येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारकडून पुरंदर येथील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. या जागेचे एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून "ओएलएक्‍स' सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विमानतळासाठी नेमकी किती आणि कोणती जागा जाणार, हे निश्‍चित होईल. जागा निश्‍चित झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विविध प्रकाराच्या पाच ते सहा परवानगी घ्यावा लागणार आहे. 

विमानतळाचा सर्वंकष अहवाल तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे, भूसंपादनासाठी पॅकेज तयार करणे, शेतकऱ्यांशी संवाद साधणे आदी प्रकाराची कामे करावी लागणार आहे. त्यासाठी विमानतळाच्या कामकाजास गती यावी, यासाठी तीन विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत ही सर्व कामे जाणार आहे. 