डिजिटल साक्षर अन्‌ झोपडपट्टीमुक्त शहर बनविणार 

ncp
ncp

पुणे - देशातील पहिले डिजिटल साक्षर शहर, पुढील पाच वर्षांत सार्वजनिक वाहतुकीचा वापर 25 टक्‍क्‍यांवर नेणार, झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांत एक लाख नवीन परवडणारी घरे बांधणार, अशी आश्‍वासने राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. गेल्या पाच वर्षांत "आम्ही काय केले' या शीर्षकाखाली दिलेली आश्‍वासने पाळल्याचे, तर पुढील पाच वर्षांत "आम्ही काय करणार' या शीषर्काखाली नवी आश्‍वासने जाहीरनाम्याच्या माध्यमातून पक्षाने पुणेकरांना दिली आहेत. 

आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा पक्षाचा जाहीरनामा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

2020 पर्यंत शहरातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती डिजिटल साक्षर करण्यासाठी 2018 पर्यंत शंभर कॉम्प्युटर केंद्र उभारण्यात येणार आहेत. महापालिकेच्या सर्व सेवा घरपोच देण्यासाठी नवीन प्रणाली विकसित केली जाणार आहे. रस्त्यावरील पथदिवे, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आपत्ती निवारण यंत्रणा एकाच ठिकाणावरून कार्यान्वित करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येईल. पालिका हद्दीत नव्याने समावेश होणाऱ्या गावांमधील लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याची वार्षिक मर्यादा साडेअकरा टीएमसी (दशलक्ष घनमीटर) वरून 15 टीएमसीपर्यंत वाढविण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात दिले आहे. 

शहरातील स्वच्छतेमध्ये अधिकाधिक लोकसहभाग आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन अकरा सांडपाणी प्रकल्प, महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान, शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी "पेडस्ट्रियन प्लाझा,' कात्रज ते खडीमशिन चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, शहरातील विविध रस्त्यांवर सक्षम बीआरटी; सिंहगड रोड, वाघोली या उपनगरांमध्ये पीएमपीचा नवीन डेपो, सर्वसामान्यांना जेनरिक औषधे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी यंत्रणा उभारणे, अशी आश्‍वासने राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात दिली आहेत. 

- पुनवडी ते ग्लोबल पुणे हा इतिहास उलगडणारे थीम पार्क शहरात उभारणार 
- नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्काडा प्रणालीची मदत घेणार 
- बीआरटीचे प्रस्तावित मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करणार 
- दहा वर्षांत दहा लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी विशेष धोरण राबविणार 
- शहरातील ऍमेनिटीज स्पेससाठीचा मास्टर प्लॅन तयार करणार 
- सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी "कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन' करणार 
- निगडी ते कात्रज असे मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण करणार 
- मुकुंदनगर भागात पालिकेचे मेडिकल कॉलेज सुरू करणार 
- पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विमा उतरविणार 
- पुण्यात शिक्षणासाठी, नोकरीसाठी येणाऱ्या युवक, युवतींसाठी वसतिगृहे उभारणार 
- सर्वंकष संस्कृती जतन आराखडा तयार करणार 
- हरित पुणे मोहीम राबवून रिक्षा, सायकल वापरास प्रोत्साहन 

जनतेचा जाहीरनामा 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने "एनसीपी कनेक्‍ट'च्या माध्यमातून नागरिकांकडून शहरातील समस्या आणि जाहीरनाम्याबाबत सूचना मागविल्या होत्या. त्या सूचनांचा समावेश "जनतेचा जाहीरनामा' या स्वतंत्र सदराखाली केला आहे. "मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स' आणि पॅरिस करारानुसार भारताने जाहीर केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शहराचा विकास करणार असल्याचे त्यात नमूद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com