अस्तित्व मॉल पालिकेच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पिंपरी - प्राधिकरणातील अस्तित्व मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण गुरुवारी दुपारी ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांनी संयुक्त कारवाई करून हटविले. सुमारे दोन तास ही कारवाई चालली. मॉलला सील ठोकून महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने त्याचा ताबा घेतला. 

महिला बचत गटांसाठी एका संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेल्या अस्तित्व मॉलचा गैरवापर होत असल्याने, ही कारवाई करण्यात आली. प्राधिकरणातील संत तुकाराम व्यापार संकुलात हा अस्तित्व मॉल आहे. बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून सवलतीच्या दरात ही जागा एका सामाजिक संस्थेला काही वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती. प्रत्यक्षात मॉल व मॉलच्या सभोवतालच्या जागेत हातगाडी, पथारीवाले यांना पोटभाडेकरू म्हणून ठेवण्यात आले होते. त्याबाबतची लेखी तक्रार नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून संबंधित मॉलचा ताबा घेण्याचे आदेश आयुक्तांनी बजावले होते. त्यानुसार गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. 

मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दर्शनी बाजूला ग्रील ठोकून काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यांचे साहित्य तसेच मॉलमध्ये असलेले किरकोळ साहित्यदेखील जप्त करण्यात आले. 

भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मिनिनाथ दंडवते यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई झाली. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, अतिक्रमण पथकप्रमुख अरुण सोनकुसरे, अतिक्रमण निरीक्षक सुरेश निगडे, ‘फ’ प्रभागाचे अतिक्रमण निरीक्षक आनंद भगत यांच्यासह अतिक्रमण पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

Web Title: Mall Corporation issue