कर्तृत्वाचा जागर!

कर्तृत्वाचा जागर!

पुणे - गृहिणी, नोकरदार असो वा उद्योजिका, अथवा उच्च पदस्थ अधिकारी असो; प्रत्येकीच्या मातृत्वाचा, कर्तृत्वाचा, शौर्याचा अन्‌ ‘ती’च्या शक्तीचा, अस्तित्वाचा जागोजागी झालेला जागर हेच गुरुवारी शहरभर साजऱ्या झालेल्या जागतिक महिला दिनाचे अनोखे वैशिष्ट्य ठरले. अगदी घरापासून ते सोसायटी, कार्यालयात जागोजागी ‘ती’ला शुभेच्छा देत विविध कार्यक्रमांद्वारे तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त होत होती.

आई, बहीण, सहचारिणी, मुलगी, मैत्रीण, सहकारी असे ‘ती’चे गुंफलेले अतूट नाते. ‘ती’च्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३६५ दिवसांतील केवळ एकच दिवस असावा, असे काही बंधन नाही; परंतु प्रातिनिधिक स्वरूपात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘ती’च्या कर्तृत्वाला विविध माध्यमांतून सलाम करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची सुरवात झाली ती अनेकांच्या घरातूनच. आई, बहीण, सहचारिणी, मुलगी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन घरोघरी आजच्या दिवसाची सुरवात झाली.

शहरात जागोजागी महिला दिनाच्या कार्यक्रमांचा उत्साह पाहायला मिळाला. सोसायटी, गणेश मंडळे, महिला बचत गट, महिला मंडळे, विविध कार्यालये यामध्येही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधून पुणे परिवहन महामंडळाने (पीएमपी) ‘तेजस्विनी’ या महिला विशेष बससेवेची मुहूर्तमेढ रोवली. महिला प्रवाशांच्या सुकर प्रवासाचा मार्ग या बससेवेच्या निमित्ताने मोकळा झाला. रेल्वे स्थानकावरही विविध उपक्रम पार पडले. राजकीय पक्षातर्फेही कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलिस, बॅंक, रेल्वे, पीएमपी, एसटी अशा क्षेत्रांत अविरत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी सामाजिक संस्थांनीही विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. महिलांनीही महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये महिला बचत गट, भगिनी मंडळ, महिला मंडळांचा समावेश होता. 

हटके सेलिब्रेशन
बहुराष्ट्रीय कंपन्यांसह आयटी, खासगी कंपन्यांमध्ये महिला दिनानिमित्त फन गेम्स, विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रम अनेक कार्यालयांचे अनोखे वैशिष्ट्य ठरले. शॉपिंग मॉल्स्‌, हॉटेल्स, फूड कॉर्नर येथेही महिलांसाठी आकर्षक ऑफर्स होत्या. विमाननगर येथील मल्टिप्लेक्‍सने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे चित्रपट विनामूल्य दाखविले. महिला दिनानिमित्त विशेष आकर्षक केक, मिठाई, चॉकलेट्‌सने दुकाने सजली होती.

‘वूमन्स डे’ झाला ‘सोशल’
‘ती आई, ती ताई, ती मैत्रीण’, ‘तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची किनार’, अशाप्रकारे महिलांच्या भावनिक नात्याचा उलगडा करणारे, ‘ती’च्या कर्तृत्वाला सलाम ठोकणारे, ‘ती’च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे संदेश काल रात्रीपासूनच ‘सोशल’ साइट्‌सवर शेअर होत आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून अनेकांचे ‘डीपी’, प्रोफाइल फोटो बदलल्याचे पाहायला मिळाले. आई, बहिण, मैत्रीण, सहचारिणी अशा विविध रूपांत आपले आयुष्य अधिकाधिक वृद्धिंगत करणाऱ्या ‘ती’च्या प्रतीची कृतज्ञता ‘सोशल मीडिया’वरही व्यक्‍त झाली. व्हॉट्‌सॲपवरील डीपी आणि स्टेट्‌स, फेसबुकवरील पोस्ट, ब्लॉगवरील लेख असो, वा विविध माध्यमांतून होणाऱ्या शेअरिंगद्वारे ‘सोशल मीडिया’वरही जल्लोष पाहायला मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com