माणसं कीटकनाशकांनी मरतायत अन् या शहाण्यांनी बुलेट ट्रेन आणली : अजित पवार

माणसं कीटकनाशकांनी मरतायत अन् या शहाण्यांनी बुलेट ट्रेन आणली : अजित पवार

सोमेश्वरनगर : ''माणसं कीटकनाशकानं मरताहेत आणि या शहाण्यांनी सव्वालाख कोटींची बुलेट ट्रेन आणलीय. ह्यांच्या बापाला पाहिजे होती का? हाय ती ट्रेन नीट चालवा ना! कोळशाच्या ट्रेन लाईटवर आणा. प्लॅटफार्मची उंची वाढवा. महिलांची सुरक्षा वाढवा. फक्त मुंबईवरून अहमदाबादला जाणार. एवढ्या पैशात देशातली सगळी स्टेशनं चांगली होतील. मोदीसाहेबांना खूष करण्याकरता सगळं चाललंय. हिवाळी अधिवेशनात या सरकारचे वाभाडे काढणार आहे. बघाच तुम्ही..'', अशी परखड टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  

करंजे (ता. बारामती) येथे ग्रामपंचायत व  प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतींचे उद्घाटन तसेच भैरवनाथ मंदिराचे भूमिपूजन पवार यांच्या शनिवारी हस्ते झाले. याप्रसंगी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते होते. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, नवनाथ उद्योगसमूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे, नीरा बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, भरत खैरे, पंचायत समिती सदस्या मेनका मगर, नीता फरांदे, सिध्दार्थ गीते, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.   

''केंद्रात व राज्यात चुकीचा कारभार चालला आहे. मोठ्यांना मोठं करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात वीजजोड दिले जात नाहीत. ट्रान्स्फॅार्मर मिळत नाहीत. हा भेद कशासाठी? दुधाची अवस्था कुणी वाईट केली ते बघा. त्या अनिकेत कोथळे तर मारूनच टाकला. आर. आर. आबा गृहमंत्री होते तेव्हाचा काळ असा नव्हता. अवैध धंदे चाललेत. आधी नोटाबंदी केली आता आता तर धनादेश बंद करायला निघालेत. हे गरीबांचं सरकार नाही. या सरकारचे अनेक विषयांवरून अधिवेशनात वाभाडे काढणार आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला. ती गोळी अधिवेशनात दाखविणार आहे'', असे पवार यांनी सांगितले.

तसेच कारखानदार गुंतवणूका करायला तयार नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढलीय. बारामतीत शाहू स्वयंरोजगार अकॅडमी सुरू करून तालुक्यातील अर्हतापात्र युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोहिम आखणार आहे, असे आश्वासनही दिले.

सरपंच प्रकाश मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी कुंभार व भाऊसाहेब हुंबरे यांनी सूत्रसंचालन केले. 

... तर फौजदारी गुन्हे दाखल करू
सोमेश्वर मंदिरातील गाळ्यांचे पुरंदरच्या कोण शिंदे नावाच्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले आहे. या बेकार कामाची चौकशीच करणार आहे. हा माझा-तुमचा पैसा नाही. हा समाजाचा पैसा आहे. ग्रामस्थांनी आपापल्या गावात निकृष्ट कामे होत असलीत तर बंद पाडावीत. कामे दर्जेदारच झाली पाहिजेत नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला. तसेच घरकुल वा अन्य सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवा. त्यांना हेलपाटे घालायला लावू नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सोनगावला ताडी पिऊन माणूस गेला. पोलिसांनी असले अवैध धंदे बंद करावेत. चिरीमीरी मागू नये, असा आदेशही त्यांनी बजावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com